Description
साध्या, सुंदर, मितव्ययी शब्दांची कविता विनायक पाटील यांची आहे. त्या कवितेला शब्दांचा सोस नको वाटतो, तसा पाल्हाळसुध्दा नको असतो. छोट्याशा आपल्या अनुभवाचं लहानसं घर करून ती कविता आपल्याला सुखावून टाकते. – ना. धों. महानोर ही कविता अटकर बांध्याची आहे. एैसपैस फापटपसारा ती टाळते. चारसहा ओळीत अनुभवांचे मर्म, भावनांचा उद्रेक, विचारांचा टोकदारपणा वाचकाच्या प्रत्ययाला आणून देण्याचे तिचे सामर्थ्य लक्षणीय आहे. आविष्कारात कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. जीवनातील दुःख- दैन्याविषयीचा कंठाळी आक्रोश नाही. ‘विद्रोहा’ ची प्रचलित आवेशी वाणी नाही. जे काही सांगायचे आहे ते अगदी मोजक्या शब्दांत सांगत आपल्या हृदयाच्या सतारीच्या तारा झंकारीत ती जाते. – पुरुषोत्तम पाटील