Description

“लेखनाच्या कृतीमुळे लेखक एकदम एका नव्याच परिस्थितीने वेढला जातो. स्वतंत्र वस्तुत्व लाभलेल्या त्याच्या लेखनकृतींकडे संशयाने, भीतीने, कुत्सेने, कौतुकाने, आदराने, तिरस्काराने, अथवा औदासीन्यानेही पाहाणारे नाना प्रकारचे वाचक त्यालाही वेढून घेत असतात. लिहिताना हा वेढा फोडून मला जावे लागते. पण लिहून झाल्यावर मात्र तो वेढा मला पुन्हा दिसतो. जे मी स्वानंदाखातर व स्वयंप्रेरणेने केले त्याच्या क्रिया मला वेढणाऱ्या लोकांवर झालेल्या असतात, आणि त्यांच्या प्रतिक्रिया माझ्यावर होत असतात. ही एक सामाजिक प्रतिक्रिया व क्रिया आहे. या लोकांपैकी अनेकांची मनोघटना माझ्याहून आमूलाग्र वेगळी आहे, बहुतेकांचे संवेदनस्वभाव माझ्याहून वेगळ्या प्रकारचे आहेत केवळ एकाच भाषेच्या परिणामकारक विनिमयक्षमतेने आम्हांला परस्परगोचर केलेले आहे. ज्या संकेतानुसार मी लेखन करतो ते संकेत व ज्या संकेतानुसार ते वाचले जाते ते संकेत निरनिराळे आहेत. आणि तरीही ते एकाच वंशपरंपरेतले आहेत. सातशे वर्षांपूर्वीचे मराठी लेखनच काय पण अन्यभाषीय लेखनसुध्दा, अपभ्रष्ट स्वरूपात का होईना, माझ्यापर्यंत पोचते ते ह्याच नियमाला अनुसरून. माणसांच्या मनोघटना बदलत्या व विविध असल्या तरीही त्यात एक कुलसाम्य आढळते, आणि वस्तुविश्वातून अनेक अर्थ सूचित होत असले तरी हे अर्थही एकाच मूलपदार्थाला लगडलेले असतात. ज्या नियमाला अनुसरून आपल्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक अंतर कापता येते, त्याच नियमाला अनुसरून अत्यंत भिन्न स्वभावांच्या समकालिनांना आपण बांधले जात असतो. “