Description
स्त्रीच्या लिंगनिरपेक्ष अशा निखळ मानुषप्रतिमेचा शोध घेण्याची उर्मी हे स्त्रीवादी कथालेखनाचे एक अत्यंत ताजे प्रतिमान घेऊन ‘परिघावर जगताना ‘ या संग्रहातील कथांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. स्त्री देहात घडणाऱ्या जैविक भातुकलीचे आंतरिक सत्य आणि लिंगसापेक्ष अस्तित्वामुळे सतत बुभुक्षित नजरांचा सामना करीत स्वतःचा बचाव करायला लावणारं बाह्य वास्तव या दोन्ही ध्रुवांतील स्त्रीकेंद्री जाणिवांचा परीघ या कथांतून व्यक्त होतो. पुरुषसत्ताक इतिहासात दडपल्या गेलेल्या स्त्रीत्वाच्या अस्मिता खुणांचा शोध घेण्यासाठी मिथ्थकथांचे पुनर्वाचन करण्यातही ही लेखिका ‘पुढाकार घेते. परंतु तरीही ‘पुरुषांचे जग’ आणि ‘स्त्रियांचे जग’ अशी द्वंद्वात्मक विभागणी टाळून निखळ मानुषतेच्या मूल्यांची पाठराखण करणारी एक नवीन नैतिक कथनदृष्टी या लेखिकेकडे आहे.
जगण्यातली ‘पार्टनरशिप’ पेलता न येणारी, केवळ उपचाराने विधी उरकण्यात धन्यता मानणारी आणि स्वतः तःभोवती ‘पोलादी कोश’ विणून संवादाला पारखी होणारी माणसे आजुबाजुला वावरत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या वाट्याला येणाऱ्या पत्नी, माता, शिक्षिका, शेजारीण अशा भूमिकापालनातूनही उपचारापलिकडचा माणूसपणाचा प्रत्यय कसा मिळवावा याचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत. सत्यापासून स्वतःला न लपवता, सत्य ओळखून आपल्या अपुरेपणावर मात करण्यासाठी स्त्रियांनी आपली असांकेतिक वर्तनशैली कशी घडवावी याचा वस्तुपाठ देणाऱ्या या कथा आहेत. आपल्या प्रतिभाधर्माला निव्वळ स्त्रीवादी जाणिवांच्या मूल्यदृष्टीला बांधून न ठेवता समग्र मानुषतेच्या मुल्यांचा संजीवक शोध घेण्यात रमू देण्याचे स्वातंत्र्य हे या कथालेखिकेचे फार मोठे आश्वासन आहे.