Description
गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या निमित्तानं केलेली काही भाषणं, लिहिलेले लेख, दोन पत्रं, एक छापली न गेलेली प्रस्तावना व तिच्यासंबंधी काही, एका नियतकालिकातील एक आक्षेप व त्याला दिलेलं उत्तराचं न छापलेलं पत्र, असा एकूण ऐवज या ‘प्रश्नांकित विशेष’ मध्ये आहे. ‘वैचारिक
‘लेखन’ या सदराखाली टाकता यावेत अशा विचारानं ते एकत्र
केले आहेत. म्हणून ‘माझं बालपण’ आणि ‘वडिलांविषयी’ हे दोन आत्मपर लेख अखेरी परिशिष्टात टाकले आहेत. (कारण या प्रकारचं आत्मपर आणखी मी लिहीन याची शक्यता कमीच आहे. आणि हे जे आहे, ते अगदीच टाकाऊ असं नाहीये, म्हणून त्याची रवानगी परिशिष्टात.)
काही लेखांची प्रासंगिकता सहज लक्षात येण्याजोगी आहे. पण त्यांच्या निमित्तानं केलेली मांडणी प्रसंगाला वगळूनही वाचता येईल, अशी मला खात्री वाटते. गेल्या काही वर्षात मी आणखीही बरंच सुट्या स्वरुपात लिहिलेलं आहे. विशेषतः कविता आणि कादंबऱ्यांसंबंधी. पण त्याची वेगळी पुस्तकं करायचं डोक्यात ठेवून सारा मजकूर बाजूला ठेवलेला आहे.
समकालीन, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रश्नांचं माझं वाचन व आकलन यांचं बऱ्यापैकी दर्शन यातून होईल, असा भरवसा वाटतो. ते समजावून घेताना वाचकांच्या मनात नवे प्रश्न उपस्थित होतील. किंबहुना ते व्हावेतच अशी धारणा हे पुस्तक सादर करताना मनाशी आहे.
हे लेख वाचणाऱ्यांना उलटसुलट विचारांना प्रवृत्त करील अशी मी आशा करतो. त्याचं पुस्तकाच्या रुपात एकत्र छापण्याचं प्रयोजनच ते आहे.