Description
२० जुलै २०१९ रोजी शब्दालय प्रकाशन संस्थेने ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी प्रकाशित केली. (२० जुलै हा मा. पठारे सरांचा जन्मदिवस. म्हणून ती तारीख टाकली असली तरी कादंबरी सप्टेंबर २०१९ पासून वाचकांना उपलब्ध झाली.) तिला मिळालेला आणि अजूनही मिळत असलेला प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी आणि नाविन्यपूर्ण होता. तो सुखद धक्का देणारा आणि काहीसा आश्चर्यकारक सुद्धा होता. रंगनाथ पठारे हे महत्त्वाचे लेखक आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्यांच्या लेखनाला इतका त्वरित आणि भरघोस प्रतिसाद मिळण्याचा प्रकाशनाचा हा पहिलाच अनुभव. पुस्तक जाईल पण नेहमीसारखे हळूहळू जाईल असे आम्हाला वाटत होते. सप्टेंबर महिन्यात पुणे येथे प्रकाशन झाले आणि दोन महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली. या कादंबरीला वाचकांनी लगेचच दिलेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ही आमच्यासाठी अभूतपूर्व गोष्ट होती. या प्रतिक्रिया लेखनातून तसेच फेसबुकसारख्या समाज माध्यमातून देखील भरघोसपणे नोंदविल्या गेल्या. परिणामी केवळ अशा प्रतिक्रिया आणि प्रतिसादांचा समावेश असलेला ‘शब्दालय’चा दिवाळी अंक २०२० मध्ये आम्ही प्रकाशित केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. विविध स्तरातील वाचकांच्या प्रतिक्रिया असलेल्या या लेखनाला वाड्मयीनदृष्ट्या संग्रहमूल्य आहे आणि म्हणून ते ग्रंथस्वरुपात राहावे, असे आम्हाला वाटत होते. या पुस्तकाच्या निमित्ताने तसे होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.