Description
ह्या सिनेमांचे सर्वात महत्वाचे बलस्थान म्हणजे ते प्रचारपट नाहीत, कोणत्याही एका समाजाची बाजू ते घेत नाहीत किंवा बदनामी करण्यासाठी काढलेले नाहीत तसेच कोणाचा उदोउदो करण्यासाठी काढलेले नाहीत. श्वेतवर्णीयांनी कृष्णवर्णीयांवर जे निघृण अत्याचार केले त्याचे ह्या सिनेमांमध्ये सुस्पष्ट चित्रण दिसते, परंतु त्यामुळे देशाची बदनामी होत आहे असा सूर तिथे कोणी लावलेला दिसत नाही. यापैकी काही सिनेमांचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक हे स्वतः श्वेतवर्णीय आहेत परंतु भूतकाळातील आपल्याच समाजाची गैरकृत्ये दाखवण्याबाबत हयगय करत नाहीत.
कृष्णवर्णीयांच्याबाबतीत वंशभेद याशिवाय बरेचसे लेख सोशल इश्यूज- सामाजिक विषयांवर असलेल्या सिनेमांबाबत आहेत, स्त्रियांचे प्रश्न, मॅकार्थीझम, मीडिया लिंचींग असे विषय सिनेमांमधून येतात. अशा सिनेमांतही उत्तम कलात्मक मूल्ये आहेत. याशिवाय पुस्तकात काल्पनिक कथानकांवरील सिनेमांबाबतही लेख आहेत.