Description
रंग्या किंवा रंगा कोण आहे ? तो प्रतीक आहे. या व्यवस्थेकडून निर्माण झालेल्या अनास्थेचे. अंगात प्रचंड शक्ती आणि कष्ट सोसण्याची वृत्ती असताना सुद्धा, ही खोलवर रुजलेली अनास्था जी व्यवस्थेमुळे निर्माण झाली त्याचा परिणाम रंगाच्या वागण्या बोलण्यात दिसतो. तो कुठेही आपलं मन मोकळं करत नाही. कारण त्याला दुसऱ्यांकडून काय प्रतिसाद मिळेल याची खात्री नाही आणि आज, त्याचा त्या प्रतिसादावर विश्वास नाही. व्यवस्था लबाड किंवा स्वार्थी आहे, अशी जणू खूणगाठच त्याने मनाशी बांधली आहे. त्यामुळे तो कुठल्याही लाभाकरता तुमच्याकडे येत नाही. ना तुम्ही दाखवलेल्या कोणत्या प्रलोभनासाठी तुमच्याकडे येत नाही आणि चुकून आला तरी त्याला हे जग असे कसे आहे. इतके भुकेलेले की? नदीतील सगळी वाळू, जणू एका रात्रीत उपसून न्यावी. सगळा निसर्गच जणू एका दिवसात गिळंकृत करून टाकतील. असा प्रश्न पडतो. एका माशासाठी दिवसभर गळ टाकून बसण्यात त्याला कुठलीही चूक वाटत नाही. या लोभी जगाकडे तो कुठल्याही अपेक्षेने पाहत नाही. किंबहुना ते त्यांने महाभारत काळापासूनच सोडून दिलेले आहे. ज्या ठेकेदाराकडे रंगा काही काळ राहिला, त्याला रंगाबद्दल मनापासून सहानुभूती वाटू लागली. त्या होर्डिंगवर लिहिलेल्या शब्दांचा परिणाम असेल तो “येवोत कितीही द्रोणाचार्य, काळ थांबणार नाही, कुठलाही ‘एकलव्य’ आता द्रोणाचार्यांसाठी आपला अंगठा काढून देणार नाही.” हे या रंग्याला सतत वाढत जाणाऱ्या ‘मोहाने’ शिकवले असेल. व्यवस्था आणि त्यातील लोभ, याला तो विटला तर नसेल. तोच तो अनुभव त्याला पिढ्यान पिढ्या येतो, की त्यांनी तो जाणून घेतलेला आहे. त्यामुळे तो स्वतःला पुन्हा त्या गोदावरीच्या काटवनामध्येच घेऊन जातो. तिथेच रमतो. गोदावरीच्या त्या अथांग खोल डोहात जणू तो स्वतःला अखंड बुडून ठेवतो, इतका की त्याच्या अस्तित्वाची कुठली खूण दिसू नये. या जगात जगण्यासाठी लागणारी कोणतीच व्यावहारिक कौशल्यें जरी त्याच्याकडे नसली तरी त्याच्याकडे आहे, ते स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे ‘भान’ बहुदा हेच त्याच्या पिढ्यानपिढ्याचे संचित आणि कमाई असावी. -आनंद वाघ