Description
निसर्गातल्या ऋतुंशी आपले जन्मापासून नाते असते. निसर्गातले ऋतु अनुभवत असतांना मनातले ऋतुही बहरत असतात. जितेंद्र कुवर यांच्या कविता वाचतांना आपण निसर्गाच्या अधिक जवळ जात असतांना मनातला मनमोर ऋतुही अनुभवत असतो. घन पावसाचे सये डोईवर जमू येती अन् ढगातले गाणे चिंब भिजल्या ओठी तू भिसी पाण्यात पाणी चिंब केसांत केसांत माळू का सये एखादे आभाळ ओले नितळ तुझ्या पल्याडल्या वाटी घन बरसून जाई अन् भर पावसात मन खुळे भिजत राही मन खुळं असल्याशिवाय मनातल्या ऋतुंच्या नितळ कविता लिहिता येत नाही. कवीकडे खुळे मन आहे. त्यामुळे जगण्यातले वेडावलेले क्षण त्याची कविता होते. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमा साध्या सरळ रोजच्या अनुभवातल्या आहेत. वास्तव आपल्याला विसरता येत नाही. पण ऋतूंची कोवळी उन्हे याची भूल आपल्याला पडतेच. ही भूलच कवीचे बलस्थान आहे असे वाटते. भूल पडल्याशिवाय निसर्गातले ऋतु आणि मनातले ऋतु यांची जवळीक होत नाही. या जवळकीतून निर्माण झालेल्या कवितेशी आपले मनही निगडित होते.