Description
प्रस्तुत ग्रंथाची जुळवाजुळव सुरू करण्याचे काम २००८ साली सुरू झाले. आता २०२२ मध्ये हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. म्हणजे हे कार्य सिद्धीस जाण्यास एकूण चौदा वर्षे लागली. चित्रे यांचे या ग्रंथातील लेखन खूप आधीचे आहे. ते अनेक ठिकाणी विखुरलेले, मिळविताना खूप अडचणी आलेल्या. त्याची पुन्हा पुन्हा जुळवणी, मांडणी करणे हे एकूण फारच जिकीरीचे आणि थकविणारे काम होते, जे सुमती लांडे यांनी अथक श्रम आणि जिद्द खेरीज दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या लेखनाविषयी आस्था आणि प्रेम यांच्या बळावर सिद्धीस नेले आहे.
चित्रे यांच्या विविधांगी लेखनाची मौलिकता स्वयंस्पष्टच आहे. या दर्जाचे लेखन एकत्र येण्यास इतका वेळ जावा यात चित्रे यांची स्वतःच्या लेखनाविषयीची विरागी बेफिकिरी जशी दिसते तशीच मराठी समाजाची या दर्जाच्या विचारांविषयीची प्रच्छन्न अनास्थाही. हे लेखन एकत्रित स्वरूपात आले ही मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी उशिरा का होईना मिळालेली एक अमोल अशी देणगी होय.
एक जागतिक दर्जाचा विचारवंत कवी आणि लेखक आपल्या भाषेत अगदी अलिकडेच होऊन गेला याची साक्ष देणारा हा ग्रंथ होय.