Description
तौलनिक साहित्याभ्यासाची आवश्यकता सद्य:स्थितीत फार महत्त्वाची मानली जाते. प्रभाव आणि अनुवाद हे तुलनेचे दोन ठळकपणे जाणवणारे घटक आहेत. दोन भिन्न भाषांमधील साहित्यकृतींची तुलना ही संस्कृती अभ्यासाची सोय असते. डॉ. वा. पु. गिंडे यांनी शेक्सपिअरचा मराठी नाटकावर झालेला परिणाम या प्रबंधात हा प्रभाव सूक्ष्मपणे शोधला आहे. अनुवादाचे महत्त्व ध्यानात घेऊन त्याची केलेली तात्त्विक चर्चा या लेखनातून पुढे आलेली दिसते. शोकात्मिका आणि सुखात्मिका या विषयीचे चिंतन, त्यांचे नाट्यतंत्र, मराठी नाटककारांनी नाट्यतंत्राबरोबरच व्यक्तीदर्शनाच्या संदर्भात शेक्सपीअरचा केलेला स्विकार व त्यातून इंग्रजी नाट्यलेखनाचा मराठी नाट्यलेखनावर पडलेला प्रभाव याची विस्तृत मांडणी या ग्रंथात आलेली आहे. परिणामी हा प्रभावाभ्यास तौलनिक साहित्याभ्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतो.
तौलनिक साहित्याभ्यासाविषयी जाणकारांच्या मतांचे विवेचन ध्यानात घेऊन ही मांडणी झालेली आहे. तत्त्वचिंतन, सखोल अभ्यास आणि परिणामकारक भाषाशैली ही डॉ. वा. पु. गिंडे यांच्या लेखनाची ठळकपणे जाणवणारी वैशिष्ट्ये, त्यांच्या लेखनाचे बलस्थान ठरते. तौलनिक साहित्याभ्यासाच्या दृष्टीने मौलिक ठरणारे हे विवेचन व विश्लेषण सर्वच अभ्यासकांना व जिज्ञासूंना दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही.