Description
श्री. शरद पवार अतिशय लहान खेड्यातून आले. शेतकरी कुटुंबातील, अतिशय खडतर अशा परिस्थितीशी झगडा देत ते उभे राहिले. शरद पवार हे हाडाचे शेतकरी. महाराष्ट्रात मंत्री व मुख्यमंत्री असताना विशेषतः शेतीच्या अतिशय बलवत्तर योजना त्यांनी राबविल्या. शेती, माती, पाणी, कोरडवाहू पीक पद्धतीसाठी नवे जलसंधारणाचे निर्णय, फळबागांचे शंभरटक्के सबसिडीचे निर्णय व नवं कृषी विज्ञान व कृषी विद्यापीठांमार्फत संशोधन शाळांमधून उभं केलं. शेतकरी व शेती हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाग आहे, म्हणूनच केंद्र शासनामध्ये कृषीमंत्री म्हणून काम करताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा, केंद्रबिंदू हा शेतीच्या बाजूच्या आर्थिक नियोजनाचा असावा म्हणून खूप आग्रहानं तसा निर्णय शासनाला करायला भाग पाडलं. धडक व कालबद्ध पद्धतीनं त्या योजना पूर्ण व्हाव्यात म्हणून रात्रंदिवस ते झटताहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात, शहरांमध्ये शरद पवार आहेत. त्यापेक्षाही देशाच्या प्रत्येक राज्यात, तिथल्या प्रश्नांशी, राजकारणांशी, चांगल्या व्यक्तींशी, संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. ते कोणत्याही पक्षाचे असोत, वर्षातून दोनदा तरी जगभरच्या चांगल्या योजनांची, अर्थव्यवस्थेची तिथल्या बलस्थानाची माहिती व तंत्रविज्ञान घेऊन महाराष्ट्रात व देशात ते रुजविण्यासाठी कार्यरत असतात. यासाठी जगभर फिरणं त्यांचा छंद आहे. महाराष्ट्राची, देशाची खरी शक्तीपीठं ही प्रतिभावंत लेखक, कवी, कलावंत, चित्र – नाट्यक्रीडा या क्षेत्रातले, विज्ञानातले शास्त्रज्ञ, गायक व प्रतिभावंत आहेत हे सांगताना त्या सगळ्यांविषयी आदरभाव, स्नेहसंबंध बाळगून ते आहेत. परिवर्तनाचे सामाजिक प्रश्न, अबलांचे सबलीकरणाचे प्रश्न व त्यांचे हक्क यासाठी काही ठिकाणी विरोध पत्करूनही त्यांनी ते प्रत्यक्षात आणले. शहरी प्रश्न व खेड्यांचे प्रश्न याची खूप जाण व सांधेजोड त्यांनी सदोदित केली. असे कधीच थकवा वा विश्रांती ठाऊक नसलेले शरद पवार सगळ्यांना आपले वाटतात.