Description
स्मशानात फुलं वेचताना
घालत होते हळुवार फुंकर
नुकत्याच निवलेल्या शांत रक्षेवर
मालिन्याचे सगळेच पापुद्रे झाल्यावर भस्म
कशी उमलून आलीत शुभ्र अस्थिफुलं
प्रत्येक फुलातला तुझा आदिम दरवळ
रंध्रारंध्रातून शिरतोय आत
शरीरबंधातून झालो होतोच ना विलग
आतली घट्ट गाठ कशी उकलायची
आणि तू तर कायमचाच गेलास शरीर टाकून
रोखलेले हजारो डोळे
तीक्ष्ण प्रश्नांचे गुच्छ घेऊन
बघताहेत एकटक माझ्या चेहऱ्याकडे
टिपत आहेत हलणाऱ्या प्रत्येक रेषेचे भाव
देहबोलीचा घेत आहेत अदमास
मला द्यायचे नाहीय उत्तर
त्यांना आणि तुलाही.