Description
ना दिशा ठरवायचा अधिकार असतो, ना मंजिल…
हिनाकौसर खान हिच्या कथा शहर – गाव अशा सीमा लांघून आधुनिक जगातील समाज आणि नातेसंबंधावरच्या पडसादांविषयीच्या आहेत. प्रेम या संकल्पनेवर लेखिकेचं मनापासून प्रेम असावं असं वाटत राहतं. प्रेमातली व्हल्नरेब्लिटी आणि रुमानीपणा दोन्ही कथांत डोकावतात. ओघवती भाषा आणि अनुभवाचा ऐवज कथा वाचताना सतत जाणवत राहतो. मुस्लीम मराठी जगण्याचे अनेक तुकडे त्यात सहज येतात. पण ते केवळ मुस्लीम समाजाचे राहत नाहीत. ते त्यापलीकडे जाऊन कुठल्याही धर्माच्या भारतीय घरातल्या विसंगतीवर बोट ठेवतात. माणसांपेक्षा समाजाचं मोठं होत जाणं सूक्ष्मपणे जाणवत राहतं. हिना कट्टरतेवर नाही तर कठोरतेवर बोलते. तिच्या कथांमधून माणूसपण जागं राहतं.
कथांमधील आधुनिक मुस्लीम पात्रांचं नियोजनदेखील महत्त्वाचं. आयटीमध्ये काम करणारे नवरा-बायको, फोरव्हीलर चालवणारी स्त्री हे वास्तव असलं, तरी अनेकदा मुस्लीम समाजाचं एका विशिष्ट पद्धतीने चित्रण होत असतं. ते लेखिका सहज मोडते.
अनेक कथा लग्नव्यवस्थेला प्रश्न विचारतात, पात्रांची घुसमट दाखवतात. कधी पात्रं ती व्यवस्था नाइलाजाने स्वीकारतात, तर कधी त्याविरुद्ध बंड करतात.
भाषेच्या पातळीवर शब्दांची निवड आणि रचना रोचक आहे. एकीकडे मुकर्रर आणि दुसरीकडे अनिष्टचिंतन. उर्दूमिश्रित बोली, मुस्लीम मराठी घरातले शब्द फार गोड वाटतात. एका वाक्यात काहीतरी गहिरं सांगून जायची हातोटी हिनाकडे आहे. ‘आपल्या शिकल्या सवरल्या जाणिवांना घरातली दुखणी बाहेर काढावी वाटत नव्हती’, ‘मैं भी सुक्की तू भी सुक्की, शादी हुई, बच्चे जने, पन आपण क्या सुधरे नै तो नैच’, ‘फुफ्फू ऊन चुकवत की डोळ्यातलं पाणी’, ‘सांगाव्याचा हंडा भरून गेलाय’ ही आणि अशी बरीच उदाहरणं देता येतील.
समाज एखाद्या बोचऱ्या थंडीसारखा या कथांमधून जाणवतो. उघड्या तनाला बोचणाऱ्या थंडीबद्दल बरेच लिहितील, पण हिनाच्या कथा वेगळ्या ठरतात. कारण विचार, समज, आधुनिकता, जाणीव यांची पांघरुणं अंगावर असतानादेखील हळूहळू आत घुसत जाणाऱ्या अन् कुणाला सांगता न येणाऱ्या हुडहुडीबद्दल ती लिहिते.
Reviews
There are no reviews yet.