Description
स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करुन, चिकित्सा करून दिले आहेत. यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या.
‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथात ताराबाई शिंदे यांनी वापरलेली भाषा आक्रमक आणि परखड असली तरी स्त्रीस्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा अनिर्बंध पुरस्कार त्यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे पुरुषांना एकांगी दोषही दिलेला नाही. – महेंद्र मुंजाळ ज्या परमेश्वरानें ही आश्चर्यकारक सृष्टि उत्पन्न केली, त्यानेंच स्त्री-पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगीं वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगीं जे आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदीं स्पष्ट करून दाखवावें याच हेतुनें हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझें मुळींच लक्ष नाहीं. स्त्री- पुरुषाची तुलना आहे.