Description
ग्रामीण जीवनासंबंधीच्या नव्या जाणिवा प्रकट करणारे कवी म्हणून आपण डॉ. रावसाहेब चोले यांना ओळखतो. ग्राम जीवनातील हर्षामर्षाचे प्रसंग ते सहजरीत्या काव्यात्म करतात. गेय रचना करणे हेही त्यांचे एक बलस्थान आहे. ग्राम जीवनासंबंधी कमालीची आस्था असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळींविषयी कुतूहल असणे स्वाभाविक आहे. किंबहुना ग्राम जीवनासंबंधी ज्यांनी लिहिले आहे, कार्य केले आहे, त्याच्यासंबंधी उत्सुकता असणे, त्यांचा अभ्यास करणे हे ग्रामीण कवीच्या दृष्टीने आवश्यकच आहे. आणि डॉ. रावसाहेब चोले यांचा या सुधारणावादी परंपरांचा, चळवळीचा मोठा सूक्ष्म अभ्यास आहे. तेव्हा अशा या अभ्यासक व्यक्तिमत्त्वाकडून सावित्रीबाई फुले यांच्यावर ग्रंथरचना होणे स्वाभाविकच आहे. ‘स्त्रीरत्न क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले’ हा छोटेखानी ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरावा.