Description
‘वेदना ते चेतना’ या ग्रंथामध्ये लेखिकेने ज्या ज्या व्यक्तिमत्वांचा आढावा घेतला तो अत्यंत चिकित्सक, मुद्देसूद आणि व्यासंगीपणाने घेतलेला आहे. एखाद्या चरित्राची अत्यंत मोजक्या शब्दांत मांडणी करणे तितके सोपे नाही; मात्र ते कौशल्य लेखिकेने अचूक परिमाणात टिपलं आहे. एखाद्या व्यक्तिच्या जीवनातून बोध घेता येऊ शकतो. शोध मात्र स्वतःच घ्यावा लागतो. तो प्रस्तुत ग्रंथात लेखिकेने घेतलेला आहे. वेदना जोपासणे सर्वांनाच जमू शकत नाही. आगीला कवटाळणे, वादळाला सामोरे जाणे, सागराला कवेत घेणे आसान काम नाही. त्यासाठी ‘ममत्व’ हरवून बसावं लागते. सुखाचे दान करावे लागते. ज्याला हे जमते तो ‘महात्मा’ पदाच्या जवळ पोहोचतो. वेदनेतील आनंद मिळवण्यासाठी संवेदना सतत चेतवावी लागते. ती जागृत ठेवली तरच वेदनेचे अमरत्व अबाधित राहील हा समतोल लेखिकेने संयमितपणे सांभाळला याचा मनस्वी आनंद वाटतो. लेखिकेने सिद्ध केलं की ‘वेदना’ ह्या मोरपिसासारख्या नसून त्याअग्निफुलांप्रमाणे असतात. त्यासाठी त्यांनी वेदनेचा दीप हातात घेणाऱ्यांची नामावली दिली आहे. नात्याला नाव कोणतेही असो पण तरीही नात्याच्या पलिकडे एक नाते असते व ते होय मानवतेचे मानवतेच्या नात्याने माणूस माणसासारखा वागला तरच मानवी जीवनमूल्यांना अमरत्व प्राप्त होईल. तेव्हाच मानवतेचं वस्त्र विणल्या जाईल. लहानथोरांना, विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितच उपयोगाचा आहे. प्रत्येकाने हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवावा इतके त्याचे मोलनिश्चितच आहे. लेखिकेच्या उत्तरोत्तर लेखनकार्याला माझ्या भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदन ! – डॉ. मंगला वि. कविश्वरप्राचार्य, होमिओपॅथी महाविद्यालय,खामगाव