Description
लहानपणापासून चित्रपटांच्या अनावर ओढीने, जेवढे चित्रपट पाहता येतील तेवढे विजय पाडळकर यांनी पाहिले. चित्रपटांविषयी ऐकले, वाचले आणि लिहिले.
‘तीसरी कसम’, ‘आंधी’ अशा काही चित्रपटांचा आस्वादक मागोवा घेणाऱ्या त्यांच्या लेखांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
मात्र महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत जीवन व्यतीत झाल्यामुळे इंग्रजी आणि अन्य भाषांतले अभिजात चित्रपट बघण्याचे भाग्य त्यांना वेळीच लाभले नाही. ही रुखरुख चित्रपटविषयक लेखन वाचून, पाहता येईल तितके पाहून काहीशी कमी झाली हे खरे; मात्र वाचनाच्या अनुषंगानेच चित्रपटांची दुनिया उमगून घेतल्यामुळे चित्रपटांतल्या साहित्यमूल्यांचाच विचार त्यांच्या समीक्षेत अधिक होत राहिला.
चित्रपटकलाविषयक अनुभव व्यापकपणे मिळण्याचा योग विजय पाडळकर यांना अनपेक्षितपणे आला. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने चालणाऱ्या ‘फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स’मधे पाडळकर यांचा समावेश झाला.
१३ मे २००१ ते ९ जून २००१ या काळात पुणे इथे चाललेल्या अॅप्रिसिएशन कोर्समधे मिळालेल्या अनुभवाची नोंद विजय पाडळकर यांनी वेळोवेळी आपल्या दैनंदिनीत करून ठेवली. दैनंदिनीच्या आधाराने या अनुभवाचे पुनर्लेखन केले दैनंदिनीतल्या संक्षिप्त नोंदींना पूर्ण रूप मिळाले आणि ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे पुस्तक उभे राहिले.
अनेक कलांत आणि जीवनव्यवहारात स्वारस्य असलेल्या, विविध धाटणीचे लेखन करणाऱ्या विजय पाडळकर यांचे चित्रपटकलेविषयीचे प्रगल्भ प्रेम आणि सखोल आकलन इथे प्रत्ययाला येत राहील.






Reviews
There are no reviews yet.