Description
देशांत इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादि अतिशूद्र, भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठे दुःख वाटतें की, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष्य असल्यामुळे ते अज्ञानी राहून ‘भटलोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत. व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाही. भट लोक त्या सर्वांस एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष्य पोंहचले नाहीं, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष्य पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्त्वापासून मुक्त करावें अशी आम्ही आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.