Vilas Sarang | विलास सारंग

Vilas Sarang | विलास सारंग

विलास गोविंद सारंग (Vilas Sarang) हे मराठी आधुनिक मराठी लेखक असून त्यांचा जन्म कारवार येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. इंग्रजी विषयात एम्.ए., तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची पीएच्. डी. (१९६९) आणि अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात तौलनिक साहित्याभ्यास ह्या विषयात त्यांनी पीएच्. डी. पदवी मिळविली. मुंबई येथे एस्. आय्. ई. एस्. महाविद्यालयात व नंतर मुंबई विद्यापीठात इंग्रजीचे अध्यापन त्यांनी केले. त्यानंतर इराक येथे बसरा विद्यापीठात (१९७४–७९) व नंतर कुवेत येथे त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले.

सारंग हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचे आधुनिक, प्रयोगशील व अस्तित्ववादी धारणेचे लेखक आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत स्वतंत्र लेखन केले आहे. कथा, कादंबरी, काव्य व समीक्षा या प्रकारांत नवनिर्मिती घडवून त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सोलेदाद हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७५ मध्ये प्रसिद्घ झाला. त्यानंतर आतंक (१९९९) हा कथासंग्रह एन्कीच्या राज्यात (१९८३), रुद्र (इं. २००६ व म. २०१०), अमर्याद आहे बुद्घ (२०११) ह्या कादंबऱ्या कविता: १९६९–१९८४ हा काव्यसंग्रह (१९८६), तसेच सिसिफस आणि बेलाक्वा (१९८२), मराठी नवकादंबरी (१९८३), अक्षरांचा श्रम केला (२०००), सर्जनशोध आणि लिहिता लेखक (२००७) ही समीक्षालेखांची पुस्तके हे त्यांचे महत्त्वाचे निवडक साहित्य. त्यांचा अ काइंड ऑफ सायलन्स (१९७८) हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्घ झाला आहे. त्यांच्या कथांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतील अनुवाद विविध पाश्चात्त्य नियतकालिकांतून प्रसिद्घ झाले आहेत. ॲलँनादो या लेखकाने फ्रेंच भाषेत केलेल्या त्यांच्या कथांच्या अनुवादाचा ल तेररीस्त ए ओत्र रेसी हा संग्रह १९८८ मध्ये प्रकाशित झाला, तसेच त्यांच्या इंग्रजीतील अनुवादित कथांचा संग्रह फेअर ट्री ऑफ द व्हॉइड या शीर्षकाने १९९० मध्ये प्रसिद्घ झाला. नंतर त्यांची द डायनोसॉरशिप (२००५) ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्घ झाली. या पुस्तकांनी सारंगांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. पुढील काळात काफ्का, सार्त्र, काम्यू व बेकेट या यूरोपीय अस्तित्ववादी लेखकांच्या वाङ्मयकृतींचा परिचय करून देणारे सिसिफस आणि बेलाक्वा हे समीक्षेचे पुस्तक सारंग यांनी लिहिले. ते त्यांच्या स्वतःच्या सर्जनशील लेखनावरही प्रकाश टाकते ह्या चारही लेखकांचा प्रभाव पचवून सारंगांनी जे कथा-कादंबरी लेखन केले, ते मराठीत अस्तित्ववादी लेखनाची एक स्वतंत्र, नवी दिशा निर्माण करणारे आहे. आधुनिक काळात जगणाऱ्या व्यक्तीचे मूलभूत व अटळ असे एकटेपण व त्या पार्श्वभूमीवर मानवी नातेसंबंधांचा शोध घेण्याची तीव्र आच माणसा-माणसांतील संवादाचा अभाव वा विसंवाद मानवी अस्तित्वस्थितीतील असुरक्षितता, भयग्रस्तता, शंकाकुल मनोवस्था आणि त्यांतून व्यक्तीला जाणवणारी अस्तित्वाची निरर्थकता व असंगतता यांसारख्या अस्तित्ववादी अनुभवघटकांचे चित्रण सारंगांच्या कथांतून आढळते मात्र या कथा भारतीय, खासकरून मराठी सांस्कृतिक वातावरणात घडत असल्याने त्या नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. सारंगांच्या कथा-कादंबरी लेखनातून आत्मभान व विश्वभान यांचा जाणिवेच्या पातळीवर एकवटलेला प्रत्यय येतो. मानवी अस्तित्वाला ग्रासून टाकणारी भयसूचक दुःस्वप्नसृष्टी सारंगांनी मराठी कथा-कादंबरीत आणली. अतिभौतिक तात्त्विक आशय साकारणारी, वास्तव व कल्पित यांतल्या सीमारेषा पुसून टाकणारी कथनशैली सारंगांनी अंगीकारली. सामान्य जीवनक्रमात अघटित, असंभाव्य गोष्टी घडल्याचे दाखविणारी अतिवास्तवता, चमत्कृतिपूर्ण कल्पनाजालाचा (फँटसी) वापर, गंभीर तत्त्वचिंतनात्मक, निखळ वास्तवदर्शी, औपरोधिक, विडंबनात्मक, हलकीफुलकी, मिस्कील अशा विविध शैलीघटकांचा व्यामिश्र पोत एकसंधपणे गुंफणारी कथनशैली व आविष्कार-रीती हे सारंगांच्या कथात्म लेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. त्यांच्या एन्कीच्या राज्यात या कादंबरीत इराकमधील राजकीय सत्तेच्या, शासनयंत्रणेच्या हुकूमशाही निर्बंधांमुळे व्यक्तिस्वातंत्र्याची होणारी गळचेपी, दडपशाहीच्या व दहशतीच्या सावटाखाली व्यक्तीची होणारी कोंडी व मानसिक घुसमट ह्याचे प्रभावी आणि प्रत्ययकारी चित्रण आहे. पाश्चात्त्य समीक्षेत ‘नवकादंबरी’ ही संज्ञा व्यक्तीच्या आंतरिक वास्तवाचा, मनोवास्तवाचा शोध घेणाऱ्या लिखाणाला उद्देशून वापरली जाते. या निकषाच्या आधारे मराठीतील कोसला, अजगर, सात सक्कं त्रेचाळीस व हॅट घालणारी बाई या कादंबऱ्यांचे चिकित्सक विश्लेषण सारंगांनी मराठी नवकादंबरी या समीक्षापुस्तिकेत केले आहे. त्यांचे मॅनहोलमधला माणूस: मराठी वाङ्‌मय, समाज व जातिवास्तव (२००८) हे पुस्तक मुख्यतः साहित्यसमीक्षापर असले, तरी त्या अनुषंगाने घेतलेला समाजशास्त्रीय शोधही महत्त्वाचा आहे.

माहिती सौजन्य: मराठी विश्वकोश

Books By Vilas Sarang | विलास सारंग