Description
समाधान महाजन यांच्या कविता जशा हळुवार आहेत, तशा त्या व्यवस्थेवर डंख मारणाऱ्याही आहेत. उगवत्या वाटेचा त्या जसा विचार करतात, तसा उसवत्या वाटेचंही गणित मांडतात. माणसाला माणूस म्हणून मान्यता देणाऱ्या मूल्यांसाठी त्या जागल्याची भूमिकाही घेतात. त्या वेदनेशी नातं सांगतात आणि प्रतिभेचे पंख घेऊन शोधायला लागतात तळ भावभावनांचा… विचारविकारांचा… अंधारानं भरलेल्या वाटांना न घाबरता त्यांच्या कवितांनी हातात धरलेला आहे आशेचा दिवा… अनेक चढण चढत, खोदकाम करत ही कविता वर्तमानाला कवटाळते आणि उद्याविषयीच्या आशा-आकांक्षांचं एक सुरेख स्वप्नही आपल्या ओंजळीत ठेवून जाते, माणसाला सुखावणारी आणि त्याच्या प्रवासात त्याला बळ देणारी ही सारी स्वप्नं आहेत… कल्पनेतून नव्हे तर वास्तवातून ती उगवली आहेत… मराठी कवितेत फुटलेलं आणखी एक कोवळंजार अंकूर म्हणजे समाधान महाजन यांची कविता होय. ती अधिक समृध्द व्यापक आणि काळीज भेदणारी व्हावी, यासाठी शुभेच्छा!