Description
समकालीन कवितेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांनी वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या मंदाकिनी पाटील यांच्या ‘आत्मपीठ’ या संग्रहातील कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचा चिंतनशील, आणि बुद्धीनिष्ठ आविष्कार आहे. प्रखर असा आत्मिक हुंकार आहे. यातील कविता जितकी आस्तित्व भानाची आहे तितकीच ती समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणारी आहे. या कवितेचा आंतरिकतेशी जेवढा घट्ट अनुबंध आहे तेवढीच ती भवतालाशी एकरूप होताना दिसते. त्यातली घाई गडबड, काळाचं सुसाटनं, दिवसरात्रीचं हुंकारणं, ऋतूंचं हेलकावणं हे सगळंच ती मानवीय पातळीवर विलक्षण संवेदनशीलतेने समजून घेते. आणि आपल्या विचक्षण प्रतिभेने त्याला एका उंचीवर घेऊन जाते.
स्वचा शोध घेतानाच ही कविता मानवी जगण्यातली जटिलता, अटळता, भयग्रस्तता, परिस्थिती शरणता त्याबरोबरच परस्पर संबंधातील साचलेपण, रुतलेपण, त्यातली व्याकुळता, अधोरेखित करत जाते… आणि अंतिमतः ती समूहमनाची होऊन जाते. त्यातली धारदार शब्दकळा, प्रतिमा प्रतीकांचं वेगळेपण, तितकंच नेमकेपण याबरोबरच कवयित्रीची प्रगल्भ अशी जीवनजाणीव यामुळे या कवितांमधील आशयाचा पोत अधिक अधिक घट्ट होताना दिसतो. त्याचे अंतस्तर उलगडताना एकीकडे आपण भोवंडून जातो तर दुसरीकडे त्यातल्या अनुभुतीशी आणि अभिव्यक्तीशी आपण आतून जोडले जातो. हेच या संग्रहाचं यश म्हटलं पाहिजे.
- संगीता अरबुने