Description
‘हाती घेऊन गाडगं भटकतो रानीवनी। अवकृपा निसर्गाची नाही नाडग्यात पाणी
काळ्या ढेकळांच्या संगे त्याची खुले भाग्यरेषा। ऊन सावलीचा खेळ रोज जीवन-तमाशा’
दयाराम गिलाणकरांच्या कवितेतील वरील ओळी वाचल्यानंतर शेतीमातीत राबता राबता आयुष्याचीच माती झालेल्या कित्येक पिढ्यांचं दुःख काळजाला चटका लावून जातं. जिथे काळजाला चटका बसतो तो शब्द अस्सल असतो. गिलाणकरांच्या शब्दांचंही असंच आहे.
‘बाप माझा शेतकरी राब-राबतो उन्हात । काळं हिरवं करून स्वप्न पेरतो मनात…
‘शेतकऱ्याच्या जीवनात दु:ख हे एखाद्या इनामासारखं बांधून आलेलं असतं. उन्हातान्हात कष्ट करून वाट्याला दुःखाचीच रास येणार हे समजूनही तो उद्याचं हिरवं स्वप्न पाहतो आणि रोज आतडी पिळवटली तरी कधीतरी देव कष्टाला पावेल ह्या भरवशावर आशेची पेरणी करत राहतो. शेतकरी आणि शेतकऱ्याची सुखदुःखे कवीला श्वासाइतकी जवळ आहे.
‘उभं आयुष्य जाळत
ऊरी अंगार झेलते
माय बनते सावली
बाग लेकाची फुलते… ‘
आईने दिलेला ओवीचा शब्द त्यांच्या मुठीत आहे म्हणून ‘बाईची गाणी’ लिहिता लिहिता ते ‘कुणब्याची कहाणी’ सांगू लागतात.
कवी दयाराम गिलाणकर ‘बळीचं जिणं’ ह्या पहिल्याच काव्यसंग्रहाच्या रूपाने ‘शब्दांची लेणी’ उभी करण्यात यशस्वी झाले आहेत.
— प्रकाश होळकर