Description
भाषा हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. किंबहुना मानवी जीवनाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून भाषेकडे पाहता येते. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे पाहता भाषाहीन समाजाची कल्पनाही करता येत नाही. मानवी जीवनात भाषेचे महत्त्व इतके आहे की माणसाची व्याख्या ‘बोलणारा प्राणी; अशीच करणे योग्य ठरेल. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषा अपरिहार्य आहे. आपल्या मनातीलविचार, भावना व संवेदना अभिव्यक्त करण्यासाठी, ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी, व्यवहारासाठी किंबहुना सर्व प्रकारच्या संदेशनासाठी मनुष्य भाषेचा वापर करतो. भाषेचा मुख्य हेतू संप्रेषण, संदेशन हाच आहे.
भाषेचा पद्धतशीर अभ्यास भाषाविज्ञानामध्ये केला जातो. गेली काही शतके भाषाविज्ञान हा विषय सातत्याने विकसित होत गेला आहे. भाषाभ्यासाच्या नवनव्या दिशा उलगडत आहेत, अनेक नवनव्या संकल्पना उदयास येत आहेत. या संकल्पनांची ओळख आपल्याला व्हायला हवी या हेतूने सदर पुस्तकाची आखणी झाली आहे. या निमित्ताने भाषेसंदर्भातील सर्वसामान्य संकल्पनांचा परिचय प्रा. सोनाली गुजर-देशपांडे यांनी करून दिला आहे. भाषाभ्यासकांना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल.