Description

कवी कैलास दौंड यांची कविता आजच्या ग्रामीण वास्तवाचे प्रखर आणि जीवघेणे दर्शन घडविणारी आहे. उद्ध्वस्त होत जाणारी मराठी गावं, तेथील शेतीची झालेली संपूर्ण वाताहत, बेभरवशाचा पाऊस, कधी मुळीच न पडणाऱ्या पावसामुळे ओसाड पडणारी रानं, तर कधी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांची झालेली धूळधाण, त्यातूनच विद्यमान ग्रामीण समाजातून तरुण पिढी ‘देशांतराला’ जाते; म्हणजे कसाबसा जगण्याचा प्रयत्न करू पाहते आहे. अशा विद्यमान ग्रामीण सामाजिक आशयाची श्री. दौंड यांची कविता आहे. ती ठोस दणकट तरी स्वाभाविक ग्रामीण प्रकृतीची प्रासादिक कविता आहे. नाजूक, नखरेल, काव्याळ शब्दांचा धोशा लावणारी नाही. प्रतिमा- अलंकारांनी अंकारण नटलेली नाही. ग्रामीण लोकजीवनातील ‘अष्टाक्षरी छंद’ ती प्रामुख्याने अनुसरते. आविष्कारासाठी ग्रामीण भाषेचाच उपयोग करते. कवीची प्रकृती काव्यात्म तर आहेच; पण कवितेतील उपरोध आणि नाट्य विशेष लक्ष वेधून घेतांना दिसते. ग्रामीण सामाजात आज एक नवी तरुण साहित्यिक पिढी उभारी घेतांना दिसते. तिच्यात प्रामुख्याने वास्तववादी जीवनाचे भावनाशील वृत्तीने रेखाटन करण्याकडे विशेष प्रवृत्ती आहे. हे लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे. कवी कैलास दौंड हे त्यांचे प्रतिनिधी शोभावेत अशा योग्यतेचे आहेत. त्यांच्या वाङ्मयीन वाटचालीला माझ्या अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद !