Description
स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच क्षेत्रात नवेपण येत गेलं. आधुनिकता व यंत्रयुगाचे संदर्भ सगळ्याच जीवन व्यवहारात येत गेले. मर्ढेकर, करंदीकरांच्या कवितेनंतर तर हे खूपच घट्टपणानं, सहजपणानं कविता – साहित्यात येत गेलं. अनुभवांसकट जीवनातल्या प्रत्येक घालमेलीला लपेटून ही ‘नवता’ आली, आणि अनुभूतीसह नवी शब्द घटना- साहित्याला वेटाळून राहिली. ग्रामीण जीवनातल्या शेती व्यवहारातही हे मोठ्या प्रमाणावर झालं. कृषी संस्कृती व गावगाड्याने वेढलेलं परंपरेतलं खेड्यातलं जीवन बदलत गेलं, पण अजूनही थेट खेड्यात गेलं तर खास खेड्यातलं जगण्यात रुतलेल शेतकऱ्यांच जीवन, त्यातली जीवन पध्दती-परंपरा-बोलीभाषेतली शब्दकळा व त्या शब्दकळेचा खास खेड्यातला ठसका, लय ही तशीच आहे. नवेपण आलं पण परंपरेतलं हे ठेवणीतलं जतन करून ठेवलेलं धन अजूनही अबाधित आहे. परंपरागत शेतीबाडी, गावगाड्याचं रूप अल्लद आपल्या कवितेत नेटकेपणानं मांडलंय ते श्री. प्रभाकर महाजन यांनी. ‘भुई तापाचे बळी’ या त्यांच्या कविता संग्रहात या गोष्टीचा ठायी-ठायी प्रत्यय येतो आणि हरवत चाललेल्या या कवितेच्या काळात शेतकऱ्यांची व गावगाड्याची ही कविता वाचतांना पुन्हा मनाला तजेला येतो. पहिल्या पाच-सात कविता वाचल्यावर मी थांबून गेलो. पुन्हा त्या माझ्या खेड्यातल्या गावगाड्यात आज विषण्ण नजरेने पाहात राहिलो. ही अस्वस्थता हीच त्या कवितेची ताकद आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, मनोहर ओक यांच्या कवितेसारखी ती सहजपणानं आपल्याशी बोलत राहते. ज्यांचा संबंध खेड्यातल्या या कालपरवाच्या कृषी संस्कृतीच्या जगण्याशी आहे. त्यांना तर खूप काही सापडल्याचा आनंद होतो. या संग्रहात मातीची लवलव, मृगाची दरवळ आणि भरगच्च आभाळशेतं आहेत. त्यात हिंदळणाऱ्या, काम करणाऱ्या पोरी-गृहिणी आहेत. बळिवंत शेतकरीही गाणं म्हणतोय. अशी ही सुख दुःखाची कविता श्री. प्रभाकर महाजनांनी रसिकांना दिली.
- ना. धों. महानोर