Description
ऐश्वर्य पाटेकरांच्या कवितेने मराठी कविता प्रगत झाली आहे. त्यांची कविता संवादी आणि रसिक वाचकांशी थेट बोलणारी आहे. सात्विक आणि स्वाभाविकपणाची लक्षणे कवितेत येणे वेगळेपणाचे आहे. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आजच्या युगात ऐश्वर्य पाटेकर यांची कविता स्वत:शी संवाद करता जनसंवादी होते. ती वर्तमानावर असूड ओढल्यासारखी भाषा करीत असली तरी तिची नाळ संतांच्या परंपरेशी घट्ट जोडलेली आहे. समंजस समन्वयाचा सात्विकपणा तिच्या ठायी निर्मळ झऱ्यासारखा वाहताना दिसतो. कवितेचा स्वभाव हा मुळातच स्वगताचा आत्मसंवादाचा असतो. आज बरेचसे कवी फॅशनेबल कविता लिहितात पण या सर्वांमध्ये पाटेकर यांच्या कवितेने नवी वाट शोधली आहे त्यांच्या कवितेत परंपरेची भाषा आहे. कोणत्याही कवितेचे अस्सलपण जेव्हा ठरवायचे असते तेव्हा ती परंपरेच्या संदर्भातच तपासून पाहावी लागते. या कसालाही कविता नितांत सुंदर उतरते.