Description
श्रीकांतची कविता गाव-जमिनीत इतकी खोल मुळे रोवून आहे की तिला कुठेही कापले तरी नवे घुमारे सरसरुन फुटतील. ही जमीन रक्त, घाम, अश्रू, दैन्य ह्यांनी सिंचिलेली आहे. ही विलक्षण जिवंतपण असणारी कविता आहे. येथे निसर्ग आणि माणूस ह्या दोन स्वतंत्र गोष्टी नाहीतच. ही कविता जगल्या-भोगल्याचा अर्क आहे. कवीच्या मनातली माया, त्याचे सतत प्रेम करणारे कातर मन ह्या ठिकाणी कायम भेटत राहते आणि आपल्यामध्ये कोवळीक निर्माण करते. – महेश एलकुंचवार, नागपूर जोतीरावांना घट्ट कवटाळून वर्तमानातील मातीला भिडणारी ही कविता शेणामातीसह अबीरबुक्क्याचाही ताजातवाना सुगंध देणारी मनस्वी कविता आहे. -भास्कर चंदनशिव, कळंब उजळमाथ्यानं कुणबीपण मिरवणारी ही कविता फक्त एक चांगली कविताच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची कविता आहे. – रंगनाथ पठारे, संगमनेर देशमुखांची कविता म्हणजे कृषीजनसमूहाचा उद्गार आहे.- राजन गवस, कोल्हापूर वारकरी अध्यात्मचिंतनाला शेतकरी कृतीचिंतनाचे स्वरूप देण्याची क्षमता या कविमध्ये आहे. ही कविता म्हणजे शेतीतले गीताभागवत- प्रा एकनाथ पगार, नाशिक देवळा देशमुखांच्या कवितेतील प्रक्षोभक आणि हिंसक प्रतिमा अरुण कोलटकरांची आठवण करुन देणाऱ्या आहेत…. अरुण कोलटकरांनी केलेला परंपरेचा उपरोध आपण पाहिला आहे, पण देशमुखांची कविता या बाबतीत चार पावले पुढे आहे. -प्रकाश देशपांडे, केजकर श्रीकांत देशमुखांची कविता म्हणजे ‘कविताधन’ आहे. – अनंत मनोहर, बेळगाव भूमीत पाय रोवून मुक्या असणाऱ्या भूमिनिष्ठांची गाथा म्हणजे श्रीकांत देशमुखांची कविता होय. – सदानंद देशमुख, बुलढाणा देशमुखांची कविता एका चिरंतन युगधर्माविषयी बोलते. याच प्रकृतीधर्माचा पडझडीच्या काळातील आत्मभान जागवणारा उद्गार म्हणजे ही कविता. -प्रवीण दशरथ बांदेकर, सावंतवाडी