Description
‘रेषा’ या प्रथमनामाने मराठी काव्यरसिकांना परिचित असलेल्या कवयित्रीचा ‘ ब्रह्मसोपान’ हा तिसरा काव्यसंग्रह होय. १९९० नंतरच्या कालखंडातील वैपुल्याने नव्हे; पण सातत्य राखत मनस्वी गंभीरपणाने काव्यलेखन करणारी ही कवयित्री आहे. स्वत:ची काहीशी वेगळी व स्वतंत्र ओळखही तिला प्राप्त झालेली आहे. म्हणून ‘ब्रह्मसोपान’ हा रसिकांना नक्कीच स्वागतार्ह वाटेल….
हा ब्रह्मसोपान कुण्या मध्ययुगीन भक्तिमार्गी स्त्रीमनाचा नाही. कवयित्रीने मनोमन स्वीकारलेल्या एका परम जीवनमूल्याचे बहुधा ते प्रतीक असावे किंवा प्रतिमा असावी. प्रतिमा मानण्याचे कारण, कवयित्रीच्या ब्रह्मकल्पनेत एकाच एका अर्थाचा स्थिर न्यास नसून वेगवेगळ्या उत्कट भावावस्थेत वेगवेगळा अर्थ सूचित करणाऱ्या नवनवोन्मेषशाली जाणिवांचा विन्यास त्या कल्पनेत आहे. ऐहिकता व आध्यात्मिकता, वास्तवता व अधिवास्तवता, भौतिकता व अधिभौतिकता, प्रत्यक्षता व स्वप्न या विविध सज्ञांनी निर्देशित होणाऱ्या पण सारतः एकाच आशयाच्या द्वैतांमधील अंतराय जोडणारा कवयित्रीच्या जाणिवांचा हा ब्रह्मसोपान आहे. आत्मिकता व ऐहिकता यांच्यातील भावनात्मक संबंधाचा हा एक उड्डाणपूल आहे.