Description
विद्यमान मानवी संस्कृतीवर तंत्रज्ञान क्रांतीचे अनेक तऱ्हेचे भलेबुरे परिणाम झाले आहेत. नवऔद्योगिक व तंत्रज्ञानप्रणित आधुनिकोत्तर काळाच्या परिणामातून गीतेश गजानन शिंदे यांची कविता निर्माण झाली आहे. या जगातले ताणतणाव आणि पेच त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. भूतकाळातील मानवी जग, निसर्गसृष्टी आणि सध्याच्या जगातील अंतर्विरोधातून ही कविता निर्माण झाली आहे. हरवलेली स्वप्नभूमी आणि आत्ताच्या कृष्णविवरातील छायांनी या कवितांना आकार प्राप्त झाला आहे.
भूतकाळातील भरलेपणाची जाणीव आणि विविध प्रकारच्या अंतरायाचा स्वर या कवितांमधून ऐकू येतो. आजच्या जगातील रिळाचित्रदर्शनातील (रिल्समधील) स्वमग्न, सेल्फी समाजाच्या एकाकी रंजनमायेची असोशी या कवितेतून प्रकटली असून आभासी मायाजाळात हरवलेल्या जगाच्या मायाबंधाची ही जाणीव आहे. भाषा आणि भावना रक्तबंबाळ झालेल्या जगाचे हे संवेदन आहे. कवितेतील या ताणतणावाला समांतर स्त्रीत्वाचा आणि वडील-मुलाचा जाणीवशोध आहे. स्त्रीचा सृष्टिशोध तसेच इतरेजनांचा तिच्याविषयीचा शोध या कवितेत असून त्यास गतविस्मृतींचे पदर आहेत. तर वडील आणि मुलातील विस्कटलेल्या विसंवादात विभक्तपणाची जाणीव आहे. हरवलेल्या जगाचा आठवशोध म्हणून या कवितेत समुद्र, झाड, स्वप्नं आणि हिमालय शोधाला विविध परिमाणे प्राप्त झाली आहेत. आधुनिकतावादी, सामाजिक तर काही प्रमाणात भावकवितेची सरमिसळ गीतेश शिंदे यांच्या कविताविश्वात आहे.
गीतेश शिंदे यांनी अभंगासारखा रचनाप्रकार सर्जनशीलतेने हाताळला असून त्यांच्या कवितेत आधुनिकोत्तर काळातील चिन्हसृष्टीचा, संवादांचा, उपहासशैलीचा आणि नाट्यात्मतेचा सहज वापर केला आहे. त्यामुळे सार्वजनिक अवकाश हरवलेल्या काळाचे आणि मनाच्या सीसीटीव्हीतून स्कॅन होणाऱ्या जगातील अंतर्विरोधांचे गडद असे संवेदन ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहात उमटलेले दिसते.
- प्रा. डॉ. रणधीर शिंदे