Availability: In Stock

Dandvidhan | दंडविधान

270.00

ISBN: 9788194459750

Publication Date: 02/07/2020

Pages: 146

Language: Marathi

Description

कवीमध्ये असं काही वेगळेपण असतं की, त्याच्याविषयी सगळ्यांनाच कुतूहल असतं. म्हणूनच तर कवींविषयी ‘निरंकुशः कवयः’ ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशा उक्ती जनमानसात पूर्वापार रूजलेल्या आहेत. ह्यातीलच एक उक्ती आहे, ती म्हणजे ‘कवी तो होता कसा आननी ?” पण कवीच्या बाबतीत विचार करता त्याच्या आननापेक्षा महत्त्वाचं असतं ते त्याचं मन आणि एखाद्या कवीचा संग्रह जेव्हा समोर येतो, तेव्हा त्याच्या मनाचं आननच त्यातून दृग्गोचर होतं.

‘दंडविधान’ वाचताना ह्या कवीचं वेगळेपण जाणवतं ते असं की, ह्या उन्मनी अवस्थेतील कविता आहेत. उन्मनी अवस्था म्हणजे कळली ना? दत्ताच्या आरतीतील ‘हरपले मन झाले उन्मन, मीतूपणाची झाली बोळवण’ असं वर्णन आहे ना, ते उन्मन! त्यामुळेच ‘दंडविधान’ मधील कविता ही अपवादात्मक सच्ची वाटते. हे सच्चेपण ही तिची खासियत आहे. संग्रहाच्या सुरुवातीला जे मनोगत आहे, त्या प्रांजळपणातूनही ह्या सच्चाईची प्रचिती येते.

एरवी, बहुतांश कवी हे आपल्या अंतरंगातील गल्ल्या, बोळं, अंधारे कोनेकोपरे, अडगळीच्या खोल्या, वळचणी, भूतबंगले, बागबगिचे, ह्यांचे दर्शन घडवत असतात. ‘दंडविधान’मध्ये मीतूपणाची बोळवण झालेली असल्यामुळे ही कविता केवळ स्वतःच्यात गुंतून राहत नाही, तर ती आसमंताशी तितक्याच संवेदनशीलतेने समरस होते. शिवाय, उन्मनाला जीवनविषयक तत्त्वज्ञान कवेत घ्यायलाच हवं असं ओझंवजा भान राहत नसल्यामुळे ते ओघात सुचेल तसं प्रगट होत जातं. साहजिकच कवितेच्या रूपड्याविषयी देखील ते फारसं सजग नसतं. तर आता कळलं असेलच की ‘उन्मन’ म्हणजे मी काय म्हणतोय ते! – एक काम करा, ‘दंडविधान’ वाचा आणि त्यातून तुम्हांला जे कवीचं मन उमजेल ना, तेच खुशाल ‘उन्मन’ आहे असं समजा.