Description
माणसाचा देह तसा तुटक तुटक असतो; कष्टात हे फार खरं असतं. त्याच कष्टातून काव्य फुलू लागलं की मग मात्र देह अवघा बनतो आणि इंद्रधनूच्या झोपाळ्यावर झुलू लागतो; भावकाव्य हाच तो देह ! सुरेश सावंत हा आमचा कविमित्र सखा असण्यात फार उदास आणि करुण आहे; त्याची सखीही त्याला समाधानानं समजून घेणारी आहे आणि आहे ती अखेर कविताच आहे. त्या सखीचा हा प्रियकर आहे; अवघ्या देहासह म्हणूनच ! कुणाचं असणं काय किंवा नसणं काय, जगाला त्याचं काही नसतं; मृत्यू पांघरून जन्मलेले असोत की आपलेच आपल्यासाठीचे असोत की नियतीचे आघात पचवून अत्तराचा पाऊस पांघरणारे असोत की व्रणांचा वणवा वाहणारे वळवणारे असोत की वैर विसरून विनाशी वादळं कवटाळणारी असोत की एकविसाव्या शतकाची अपत्यं असोत. जग जगाच्या ठायी ठाम असतं हे नवीन नाही. फार पूर्वापार आहे. कवीचं काम तिथं असतं आणि तिथूनच सुरू होतं. ज्याचा त्याचा भाग ज्याच्या त्याच्या कपाळी, भाळी कोरलेला असतो हे तसं ठावूक असलं तरी उद्याचा भरोसा कवीच देत आलेला आहे; वादळंही बहकतात याचा हिशेब कवीच देत असतो. आणि शेवटी हिशेब हाच की ‘धुनी’. उरल्यासुरल्यांची कणव असलेला हा कवी आहे!