Description
प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार.
यावर्षी ‘प्रवास विशेषांक’ घेऊन आलो आहोत. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रवास हा अविरत सुरूच असतो. कुठूनतरी सुरुवात होऊन कुठेतरी पोहचण्याचा प्रवास.
आपण मानसिक, शारिरिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सतत हा प्रवास अनुभवत असतो. अपेक्षीत किंवा अगदी अनपेक्षित वळणावर नेऊन पोहचवणारा प्रवास.
दरम्यान काहीतरी निसटून गेल्याची हुरहुर लावणारा किंवा अचानक, अकल्पित काहीतरी गवसल्याचा प्रवास. प्रवाहाप्रमाणे वाहत जाऊन झालेला प्रवास असो किंवा प्रवाहाविरुद्ध केलेला खडतर प्रवास.
आपण ज्या जगात राहतोय त्या जगाचा प्रवास कोणत्या दिशेला चालला आहे हे आपण पाहतोच आहोत. आज तिशीच्या पुढे असणारे सर्वजण, जगात गेल्या काही दशकात घडलेल्या मोठमोठ्या बदलांचे साक्षीदार आहेत. एकीकडे संसदेत महिला आरक्षणाविषयी चर्चा सुरू आहेत तर मणिपूर येथे घडलेल्या महिलावरील अमानुष अत्याचारांच्या घटना घडत आहेत. मुळात ह्या घटना घडूच नयेत यासाठी पावलं उचलली जायला हवीत. पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे शेतकरी खरीप पिकांना मुकला आहे हे स्पष्टच आहे. आता शेतकर्यांच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची जास्त गरज आहे. ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असे म्हणणे क्रूरपणाचे ठरेल. कधी नव्हते एवढे तंत्रज्ञान आज विकसित झालेले आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजंसमुळे तर अनेकांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत. आता तंत्रज्ञानाचा यापुढचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे येणार्या काळात समजेलच.
रशिया-युक्रेननंतर आता इस्त्राईल-पॅलेस्टाईनचे सुरू असलेले युद्ध. हजारो बॉम्ब टाकले जात आहेत, असंख्य लोक निर्वासित होत आहेत. निष्पाप लोकांचे निष्कारण जाणारे बळी, तिथल्या मुलांच्या हालअपेष्टा यासंबंधीच्या काळीज हलवून टाकणार्या बातम्या आपल्यापर्यंत येतात. या बातम्या ऐकून/ वाचून हळहळण्या पलीकडे आपल्या हातात काही नसते. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते लहान मुलांचे. युद्धासारख्या भयानक गोष्टीमुळे स्वतःचे उद्ध्वस्त झालेले कुटुंब पाहून कसं भावविश्व तयार होईल या मुलांचं? युद्धामुळे सामान्य माणसाचे नुकसानच होत आलेले आहे. आता तरी ही युद्धं थांबायला हवीत हा आशावाद फक्त आपण बाळगू शकतो. त्या आशावादाला धरूनच आपण पुढे जात राहतो.
अतिशय वाढलेला स्क्रिनटाईम, ढासळलेली अर्थव्यवस्था, ग्लोबल वार्मिंग यासारख्या समस्यांना तोड देण्यासाठी ‘आशावाद’ जिवंत ठेवावाच लागणार आहे.
‘मंझील से खुबसूरत सफर है’ या न्यायाने अनेकविध प्रवासांच्या गोष्टी जमवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.
या अंकाच्या निर्मितीसाठी बहुमोल योगदान देणारे आमचे सर्व लेखक, कवी, चित्रकार, जाहिरातदार, मुद्रक, आमचा संपूर्ण स्टाफ आणि कुटुंब यांचे मनःपूर्वक आभार.
ही दिवाळी आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सकारात्मकता, आरोग्य, संपदा घेऊन येवो. शांततापूर्ण, सुंदर नवीन युगाकडे जगाचा प्रवास सुरू राहो.
खूप शुभेच्छा. सदिच्छा – मृण्मयी पाटील-लांडे