Description
आज दलित कविता क्रांतिकारक वळणावर आहे. पण त्यातील पुरुष कवींनी जादा जागा व्यापलेली आहे. तो आज मोठ्या संख्येने बोलू लागला आहे. पण दलित स्त्री वाङ्मयाच्या क्षेत्रात मुकीच आहे. अपवाद म्हणून दोन-तीन कवयित्री बोलू लागल्यात, त्यात हिरा बनसोडे ह्या विजेची वेल होऊन तळपत आहेत. स्त्रियांच्या दुःख-वेदनेला, त्यांच्या काळीज गोठवणाऱ्या आकांताला नवी विद्रोहाची धार कवितेच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते. त्यांची ही फिर्याद सांदी-कोपऱ्यातली नाही, तर ती पुरुष-प्रधान संस्कृतीच्या व्यासपीठावरची आहे. त्यामुळे नकळत तमाम स्त्रियांच्या दुःखाला ती स्पर्श करते. नव्या विचारांचे स्फुल्लिंग पेटवते. तारे, समृद्ध, फुले, कातरवेळ, प्रेम, निसर्ग ह्या परंपरागत रिंगणात ही कविता अडकत नाही अथवा चार भिंतींच्या खुराड्यात ती रडत बसत नाही. भोवतालच्या घनदाट काळोखावर विजेचे आसूड फटकारत कविता क्रांतिकारक आशावाद व्यक्त करते. त्या अंधाऱ्या प्रदेशात सूर्योदय घेऊन मी जात आहे – केविलवाणे सूर्यास्त वळणावळणावर खाली मान घालून उभे आहेत शरणागतासारखे !