Description
जगणं कोलाहल वाटावं इतका हा धकाधकीचा काळ! भय, चिंता, निराशा आणि दुःखाने व्याकूळ झालेल्या कवीला कवितेचा आधार वाटतो. कवितेचे बोट धरून तो हिरव्या बोलीचे अर्थ उमजून घेण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाला मनात रुजवून मोरपिशी स्पर्शजाणिवा विकसीत करतो. प्रतिमेच्या कवडशांनी तो क्षण होऊन काळजात वस्ती करतो. जाडंभरडं काळीज अनुभूतीच्या तळापर्यंत घेऊन जातो आणि जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. खरंतर हा एक दीर्घप्रवास आहे जगण्यापासून जगण्यापर्यंतचा !
जगण्याच्या कोलाहलात टिकून राहण्यासाठी संयमी पण तितकाच निश्चयी स्वर घेऊन कवी येतो. निसर्गप्रेम आणि मानवतेची सद्यस्थितीतील अनिवार्यता पानापानातून अधोरेखित होते. जगण्याच्या या कोलाहलाचे एका नीरव शांततेत रूपांतर करण्यात कवीला यश आले आहे. त्याची जीवनविषयक नीतळ दृष्टी आणि प्रामाणिक अभिव्यक्ती कवितेला वेगळी उंची प्रदान करते!