Description

शुभम दुरगुडे सारखा एक तरुण विद्यार्थी इतक्या कमी वयात त्याच्या कवितेमधून जन्म जन्मांतराचा अंतिम शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या बालवयापासून करतो हे खरंच आश्चर्य करणारं आणि थक्क करणारं आहे. अगदी लहान वयापासून कवितेचा छंद, पण केवळ शब्द आणि कल्पना विलास, निसर्ग, प्रेम, भावभावना यांच्या शब्दजंजाळात न अडकता जीवनाचा अंतिम शोध, शाश्वत मूल्य किंबहुना जीवनाची आसक्ती, वैभव, संपत्ती, किर्ती, लौकिक किंवा ऐहिक सुख यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना शेवटी एकाच वाटेकडे जायचंय आणि ते म्हणजे स्मशान. मृत्यू हाच शाश्वत आहे. यासाठी जीवनाचा आटापिटा न करता, निराशेचा कुठलाही स्पर्श न होऊ देता, उदासपणा बाजूला झाकून सदैव, प्रत्येक क्षणाचा आनंद कसा लुटावा त्याचे एक मौलीक तत्त्वज्ञान, विवेचन, अत्यंत सोप्या, साध्या भाषेत, शब्दांत व्यक्त करणारा ‘जन्मांतर’ हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. शुभम केवळ माणसाकडेच नव्हे तर जगातील सचेतन सजीव जिवांकडे बघतो आहे आणि अशीच माणसे मृत्युंजय होऊ शकतात…