Availability: In Stock

Jyacha Tyacha Chandva | ज्याचा त्याचा चांदवा

220.00

Isbn : 9788194459767

Publication Date : 20/11/2020

Pages : 144

Language : Marathi

Description

कविता हा सर्वांत कठीण असा साहित्य प्रकार आहे, असे मी मानतो; एक तर कविता ही आत्मनिष्ठ असते, तसेच विचार, भावना, संवेदना, प्रतिकिया आणि सूक्ष्म निरीक्षणाचा गोळीबंद आविष्कार असते. ज्या कवीची स्वतःची खास अशी नजर असते, त्याची कविता भाऊगर्दीतही उठून दिसते – आपल्या अंगभूत वेगळेपणानं ! अशी मातीशी नातं सांगणारी, शहरी आणि ग्रामीण जीवनाचे अनुबंध उलगडणारी, अत्यंत तरलतेने मानवी मनाचा व नात्यांचा तळ शोधणारी आणि प्रत्येकाला आपल्या मनातल्या चांदव्याची भेट घडवणारी सहज, साधी, अन् तरीही सार्वत्रिक असणारी वेगळी कविता अंजली ढमाळ घेऊन आल्या आहेत.

कृषी संस्कृतीत वाढलेली ही कवयित्री, ‘काळी माती जशी पिकं जन्मास घालते तशी कविता माझ्यातून निर्माण होते’ असं सहज, नैसर्गिकतेनं सांगते, तेव्हा हे तिच्या कवितेचं प्राणतत्त्व आहे, हे हा काव्यसंग्रह वाचताना ठायी ठायी जाणवतं. ‘जेवढी बुद्धीला तीव्र धार, तेवढी वेदनेची चिरफाड जोरदार’ असं म्हणत पिचलेल्या माणसाशी, मातीशी आपल्या सर्वांचं असणारं नातं प्रकट करणारी ‘नाळ’ जपणाऱ्या आणि केवळ प्रश्न करणाऱ्या नव्हे तर उपायही सुचवणाऱ्या, तीव्र समाजभानाच्या कविता, ही कवयित्री घेऊन येते. ‘शतकांच्या अन्यायाचा धगधगता अंधार, कसा शांत होईल तात्विक चचर्चानी?’ असा खडा सवाल करत, ‘तुझं तेज झाकायला फाटका अंधार गोळा केला’ या धारदार ओळीतून अस्वस्थ वर्तमान ताकदीने व्यक्त करते. तर आजच्या अस्थिर, अशांत व अस्वस्थ काळात कोलमडून पडलेल्या, उमेद हरवून बसलेल्या मानवी मनास, ‘काळोखाचे वारे’, ‘उजाडेपर्यंत’, ‘गरूडझेप’ यांसारख्या कविता, कुठेही प्रचारकी न होताही प्रेरणा देत राहतात, आत्मबल देतात. तर ‘मला अजूनही आजार आहे’ यांसारख्या कवितांतून कोमेजल्या मनास सोबत करू पाहतात. ‘बाई… खूप काही’ यांसारख्या कवितांतून समस्त भारतीय स्त्रीचं जगणं उलगडतात!

अशी ही कवयित्रीने संवेद्य भावाने, तटस्थ बुद्धीने, नितळ मनाने व सच्च्या हृदयाने मानवी जीवनाची केलेली सकल शोधयात्रा. हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह वाटू नये, एवढी प्रगल्भ आणि वाचकांच्या भावविश्वाचा भाग होणारी कविता त्यांनी लिहिली आहे!

~ लक्ष्मीकांत देशमुख

Additional information

Book Author