Description
हिंसा, शोषण, चंगळवाद, स्वार्थ या सगळ्यांच्या कोलाहलानं गजबजलेल्या आजच्या अस्वस्थ काळात प्रियदर्शन या समकालीन हिंदी कवीच्या कविता आश्वासक आधारासारख्या आहेत. ही कविता संवेदनांचं कृत्रिम प्रतिमांकन न करता अनुभवाच्या थेट अभिव्यक्तीतून आकारते. रोजच्या जगण्यातल्या साध्या अनुभवांमधल्या वैश्विकमूल्यांना स्पर्श करते. ती ढोबळ अर्थानं विधानात्मक नाही, तर संवेदनात्मक आहे. छोट्या शहरातल्या मध्यमवर्गीय जगण्याचे ठोस संदर्भ असलेली ही कविता साध्या, वरवर गद्यप्राय वाटणाऱ्या लयींचा भेदक वापर करते. मूल्यांच्या ऱ्हासानं काळवंडलेल्या जगण्याला सामोरं जाताना ही कविता कवीच्या डोळस आशावादाचंही माध्यम होते. हा आशावाद करुणेच्या भूमीत रुजून आलेला आहे, म्हणूनच त्याची अस्सलता वाचकाला भिडते.
प्रियदर्शन यांच्या कविता मराठीच्या सरहद्दीत आणून विजय चोरमारे यांनी मराठी कवितेत मोलाची भर घातली आहे. चोरमारे स्वतः संवेदनशील कवी आणि पेशानं पत्रकार आहेत. त्यामुळे प्रियदर्शन यांच्या कवितेत पृष्ठभागाखालून वाहणारे सामाजिक, राजकीय संदर्भ नेमकेपणानं पकडून मराठीत आणणं त्यांना नेमकं जमलं आहे. ही कविता शाब्दिक कसरतीचा मोह टाळून वाचकाशी थेट प्रामाणिक संवाद करते. वाचकाच्या घुसमटीचा शब्द होते. आजच्या काळाची बैचेनी या कवितेतून डोळे उघडून थेट वाचकाशी बोलते. हे मराठीत आणणं जिकिरीचं होतं. कारण त्यात सरळपणाचं रूपांतर सोपेपणात व्हायचा धोका होता. चोरमारे यांनी सजगपणे हा धोका टाळून या कवितेतल्या मूळ संतापाची बूज राखून मराठीत आणल्या आहेत. त्यातली तिडीक आणि संवेदनशीलता मराठीत आणण्यासाठी चोरमारे यांना सापडलेली समांतर काव्यभाषा नेमकी आणि चपखल आहे.