Description
शब्दाच्या वजनाचे आणि मोजमापाचे इतके भान, त्यामुळे रचनेला येणारा बंदिस्तपणा, तरीही आशयाला पूर्ण मुक्तता आणि आशयातली मनस्वी उत्कटता –
शब्द मलाही कळतो. त्याचे वजन मलाही माहीत आहे. अनेक पदरी आशय किमान शब्दात व्यक्त करणे मलाही आवडते. पण तुझ्या कवितेत मी जे पहातो ते मला जमते असे मला वाटत नाही.
जुने नवे कवी मी वाचले आहेत, वाचतो. तुझ्या कवितेत, त्यातले काही मला सहसा भेटत नाही. ती तिचीच आहे. नव्या कवितांपेक्षा ती खोल आहे, सूचक आहे, परिपक्क आहे, नेमकी आहे. तिच्यात एकादा निसटता क्षण स्थिर आणि जिवंत करण्याची किमया आहे. आणखी काय हवे ? पूर्ण मानव तशी तुझी कविता ‘पूर्ण कविता’ आहे. प्रचंड आवाका ती आपल्या इवल्याशा मिठीत सहज पकडून धरते.
तुझ्या कवितेला जगूनच भेटायला हवे.
… तुझ्या कविता आवडल्या म्हणतांना मला
अपराधी वाटते.
ज्या मानसिक अवस्थेतून त्या जन्माला येतात तिची पूर्ण कल्पना असल्याने Excuse me, I have liked your poem असे म्हणावेसे वाटते. तुझ्या कवितेला एक स्वतःचं प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, बळ आहे, खोली आहे, अस्सलपणा आहे. मुख्यतः व्यक्तिमत्व आहे आणि ते मनस्वी तरी कमालीचे संयत आहे, सोशिक तरी समर्थ आहे. ते फार थोडे बोलणारे आणि पुष्कळ व्यक्त करणारे आहे. त्याचे हे गुण वाढतातच आहेत.
हे जाणवणारे मला भेटावेत असे फार वाटते.
विजय तेंडुलकर