Description
‘मालगुंडचा सिध्दू’ या कथासंग्रहातील कथा ‘मालगुडी डेज’ ची आठवण करून देणाऱ्या आहेत. या कथांचा नायक अनंता उर्फ सिध्दू हा आहे. अनंता नवोदयची परीक्षा उत्तीर्ण होतो. त्याचे रत्नागिरीला जाण्याचे नक्की होते, इथपर्यंतचा कथाभाग या संग्रहात आहे. कोकणातील मालगुंड गावातील अनंता उर्फ सिध्दू, शिरीष उर्फ शिन्या आणि मीरा या बाल सवंगड्यांचे जीवन या कथांतून येते. प्रत्येक कथेचे स्वतंत्र अनुभवविश्व आहे, तसेच त्यांच्या मालिकेतून मुलांचे जीवन, त्यांचे भावविश्वही साकार होते. या जीवनात काही ज्येष्ठही आहेत. त्यामध्ये गोष्टी सांगणारे आबा, कोंबड्या चोरणारे आणि भुतांच्या गोष्टी सांगणारे रामण्णा, गंगू आजीचा सैन्यातील भाऊ, नंदू मामा, आत्या, अम्मी, चांदभाई आहेत. या सगळ्यातून मालगुंड उभे राहते. गावातील आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे स्मारक, अस्पृश्य सिद्धनाकचा पराक्रम यासारख्या अनेक कोकणची दैदीप्यमान परंपरा समजते. त्याचप्रमाणे लिंबे ठाकूर, संन्याशी अशी काही व्यक्तिचित्रेही साकार होतात.
या कथांतून मालगुंडमधील तीन मुलांचे जीवन, त्यांचे भावविश्व साकार होते. सिध्दूचे कल्पनाविश्व, मीराचे मासळी पकडण्यासाठीच्या बोटीचे स्वप्नही समोर येते. या कथांतून मुलांचे बालविश्व, त्यांच्या कल्पनेचे जग, त्यांचे प्रश्न कुतूहल साकार होते. तसेच या मुलांचे काही कारनामे, फजिती, गंमतीजंमतीही येतात. त्याचवेळी गावाच्या परिसरातील समृद्ध निसर्ग, समुद्र, माड, आंबे, फणस, बहरलेला बहावा, कोंबड्या, बकरे, मासे, सांकव, पन्हे दिसतात. दर्याची गाज ऐकू येते. त्याचबरोबर या कथा अंधश्रद्धा दूर करीत मुलांवर मूल्यशिक्षणाचे धडे देत संस्कार करीत जीवनाचा मार्ग सांगतात. म्हणून या कथा बालसाहित्यात महत्त्वाच्या ठरतील असा विश्वास वाटतो.