Description
यादवकाळ ते अव्वल इंग्रजी काळ अशी जवळपास सहाशे वर्षांची परंपरा लाभलेले मराठी वीरशैव वाङ्मय हे मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण दालन आहे. परंतु मराठी वाङ्मयेतिहासात त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली, असे म्हणणे अवघड आहे. या पार्श्वभूमीवर मराठी वाङ्मयाचा समग्र इतिहास सिद्ध होण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक टाकले गेलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे प्रस्तुत लेखसंग्रह आहे. ‘मराठी वीरशैवांचा आद्यग्रंथ ‘शडुस्छळि’, महाराष्ट्र आणि मराठी संत परंपरा यांच्याशी वीरशैवांचा असणारा अनुबंध, वीरशैवांची समन्वयाची भूमिका, सुधारणावादी दृष्टी आणि भारतीय समाज सुधारणेला योगदान देणारे म. बसवेश्वर – या आणि अशा महत्त्वपूर्ण बाबींचा केलेला उहापोह हे मराठी वीरशैव वाङ्मय : एक अवलोकन या लेखसंग्रहाचे वेगळेपण आहे.
डॉ. श्यामा घोणसे या वीरशैव धर्मसंप्रदायाच्या अभ्यासक म्हणून जशा परिचित आहेत, तशाच त्या भारतीय पातळीवरील संतसाहित्याचा आधुनिक जाणिवांच्या अंगाने वेध घेणाऱ्या ‘समीक्षक वक्ता’ म्हणूनही परिचित आहेत. अलक्षित विषयाला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न, ठोस स्वरूपाची मांडणी, चिकित्सक व तुलनात्मक अभ्यास हे या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य मराठी वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला पूरक ठरणारे आहे.