Description
जयराम खेडेकरांची कविता ही अस्सल खेड्याच्या जगण्याने झपाटून गेलेल्या बेहोश मनाची कविता आहे. त्यामुळेच मायमातीचा काळा कसदारपणा, जीव-जित्राबाच्या शेणामुताचा गंध, शिवारधनाचा पोपटी हिरवेपणा, चिडी- पाखरांचा किलबिलाट, गढी- बुरुजांची पडझड, गावपांढरीच्या संस्कृतीची आखिव रेखिवता आणि या साऱ्यांना व्यापून असणाऱ्या कुणब्याच्या जगण्याचे सारे नाद- निनाद एका उन्मादातून या कवितेने आविष्कृत केले आहे. खुज्या, खुरट्या आणि ढोंगी शहरी संस्कृतीच्या संपर्काने पार करपून गेलेले खेड्याचे टवटवीत तजेलदार ‘गावपण’, माणूसपणाच्या शुकशुकाटाने गावाला आलेली अवकळा आणि कायम दुष्काळ पोसणारे जन्माचे उन्हाळे यातून गावाच्या नशिबी आलेला उदासलेपणाचा भोगवटा हा या कवितेच्या चिंतनाचा विषय असला तरीही गावपांढरीची थकलेली, थरथरलेली ‘ओवी’ उद्याच्या संपन्न खेड्याची ‘दिवेलागण’ करीलच असा दांडगा आशावाद ही या कवीच्या कवितेचा खरा ‘श्वास’ आहे. ‘शृंगार’ हे खेडेकरांच्या कवितेचे एक दुसरे स्वाभाविक वैशिष्ट्य. एखाद्या सात्विक खानदाणी स्त्रीने दारासमोर सडा-सारवण करून दळदार रांगोळी रेखाटावी; एवढे घरंदाज स्वरूप या शृंगाराचे आहे. लोकसाहित्यात व लोकसंस्कृतीत सच्चेपणाने रुजलेली आणि स्वतःची ढब व आव सांभाळून आलेली या कवितेतली शब्दसृष्टी खास ‘खेडे’ करी आहे. शेवटी गावपांढरीच्या ‘पंढरी’ला समृद्ध करण्यासाठी व गावशिवाराच्या ‘मेघवृष्टी’साठी ‘कुणब्याला देरे जीवदान’ असा सदैव ‘जोगवा’ मागणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा ‘पांडुरंग’ ओरिजनल आहे हे पुन्हा वेगळे सांगण्याची गरजच उरत नाही.