Description
ग्रामीण व्यक्तिरेखांचे विविध कंगोरे हळुवारपणे संजीव गिरासे यांच्या कथांमधून उलगडतात. भाव-भावना, स्वप्नं, अपेक्षा, आकांक्षा, निष्ठा, प्रेम आणि संवेदना अशा अनेक मानवी मनाच्या तंतूंची वीण या कथांमध्ये आढळते.
साहित्याला प्रादेशिक चेहरा असतो. ‘मिरला’ या कथासंग्रहाला खान्देशचा चेहरा प्राप्त झाला आहे. गिरासेंनी अहिराणी भाषेच्या सौंदर्याला कुठेही धक्का न लावता ही भाषा अतिशय सहज-स्वाभाविकपणे या कथासंग्रहात वापरली आहे. खान्देशचे प्रतिनिधीत्व ‘मिरला’ करतो.
प्रस्तुत ‘मिरला’ गिरासेंचा चौथा कथासंग्रह आहे. यात स्त्रीवादी कथांसह ज्येष्ठांच्या वेदना लवचिक शब्दात मांडल्या आहेत. चिपटं, दौलत, कृतार्थ इत्यादी कथा ज्येष्ठांच्या व्यथा मांडतात. येसू, तांबडं फुटलं, मशीन, कलंक, जत्रा या कथा स्त्रीत्वाच्या सन्मान करीत जगण्याची धडपड करतात तर पेट्रोलपंप सारखी कथा आजच्या ग्रामीण व्यवहाराची सद्यस्थिती सांगते.
मानवी मनाच्या भाव-भावनांच्या कल्लोळातून प्रकट होणाऱ्या कथा वाचकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. वास्तवतेच्या पातळीवरून प्रवास करीत विषयातील नाविन्य व लेखनातील प्रयोगशीलता यामुळे ‘मिरला’ हा कथासंग्रह ग्रामीण साहित्यात महत्त्वाचा टप्पा गाठू शकेल आणि वाचकालाही अंतर्मुख करेल, असा विश्वास वाटतो.