Description

‘लक्ष्मण बारहाते’ यांची कविता जशी शेतशिवाराचे दुःख मांडते; तशी ग्रामीण जीवनात बदलत जाणाऱ्या गावाचेही दुःख व्यक्त करते.नात्यांमध्ये वाढत चाललेलं कोरडेपण, जगण्यातलं सामर्थ्य हरवून बसलेली माणसं, शेतात राबता राबता दुःख भारानं मोडून पडलेला शेतकरी असे कितीतरी प्रश्न बारहाते यांच्या कवितांचे विषय बनतात आणि अस्वस्थ करतात. माणसाच्या सुखदुःखाचे अभंग गाता गाता कपाळाला मातीचाच टिळा लावून ते उद्याचं हिरवं स्वप्न पाहतात. राबणाऱ्या हातावर आणि शेतीमाऊलीवर त्यांची अपार श्रद्धा आहे, म्हणूनच त्यांना पाचबिघ्याचा लहानसा जमिनीचा तुकडाही पाईनी इतका पिकेल असा भरवंसा वाटतो, परंतु त्या अगोदरच ह्या पाचबिघ्यात उगवून आलेल्या अस्सल कविता वाचकांना निश्चितच अंतर्मुख करतील आणि चांगली कविता वाचल्याचा आनंद देतील.