Availability: In Stock

Roop Arupache | रूप अरुपाचे

100.00

Publication Date:01/05/2007

Pages:96

Language:Marathi

Description

रा. अशोक नीलकंठ सोनवणे हे खानदेशातील एक महत्वाचे कवी आहेत. एखाद्या कलावंताचे प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाचे असणे एकूण सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाचे मानावे लागते. कुठल्याही प्रदेशातील मानवी संवेदनांचा अवकाश समकालीन समाजव्यवस्थेच्या खोल तळाशी जावून व्यापक होत असतो. “रूप अरुपाचे” या काहीशा दीर्घ आणि अधूनमधून स्वतंत्र कवितांमधून त्यांची कविता आपल्या भूतभविष्यासह वर्तमानाचा शोध घेतांना दिसते. आशयाच्या अंगाने विचार करता ही कविता बरिचशी पारंपरिक वाटत असली तरी वर्तमानाचे सजग भान या कवितेमधून वारंवार जाणवते. पहिल्या सर्गात कवीच्या आठवणी ‘आई’ या एका महान प्रतिमेचा शोध घेतांना दिसतात. चिगुंटांना मनासारखंच निर्मळ करणारी आई, तिचं दररोजचं जगणं, ओल्या भाकरीपायी तापलेला तवा होणं, खाटेवर थापटलं जाणं, स्मशानात गेलेल्या गोवऱ्यांची अस्वस्थ राख तिच्या आत्ममग्न डोळ्यात भुरभुर उडत असणं किंवा दुपारच्या निवांतपणासकट तिचं देवकापूस पिंजणं- कवीच्या आस्थेचा आणि एकूणच संवेदनेचा अवकाश व्यापणारी आई आपल्यालाही अस्वस्थ करते. मानवी करुणेचे एक आर्त आणि व्याकूळ करणारे प्रतिक म्हणून उभी रहाणारी आई समष्टीच्या दुःखाचे आणि मानव्याचे प्रतिक बनते. दुसऱ्या सर्गात कवीच्या आस्थेचे अनेक विषय आहेत. घासासारखे त्रास मोजायचे नसतात, हे समंजसपणे सांगणारा बाप जसा आहे तसाच तीर्थरुपांच्या कुबड्यांचा विचार करणारा मुलगाही आहे. हिरवळ चोहिकडे आता दाटतच नाही, या जाणिवेने अस्वस्थ होणारे कवीमन खुंटयाच्या ढोराला कधी खिजवायचं नसतं या जाणिवेतून आपल्या भूमिनिष्ठ जाणिवांनीही व्यापलेले आहे. संग्रहातील प्रत्येक कवितेतून येणारे प्रतिमाविश्व कवीचे वर्तमानाशी असणारे आपलेपणच नोंदविते. पावसाची अनेक रुपं कवी अस्वस्थ होवून मांडतो. तसेच, ‘सर्व काही माहित असूनही, भारत माझा देश आहे, असं का छापलेलं असतं पहिल्या पानावर यामुळे अस्वस्थ होणारा कवी गांधीच्या माकडाबद्दलही बोलतो. ओवीसारखा उराउरी भेटणारा पाऊस जसा त्याला अस्वस्थ करतो तसेच गुदामाच्या आल्यावरचे जुनाट डीडी. टी. चे थेंबही खूप काही सांगून जातात. मौजे नागलवाडीतली दुःखे लाखो करोडो रुपयात मोजता आली असती तर बरं झालं असतं, ही दुःखाची अवकाशव्यापी जाणिवही ही कविता व्यक्त करते. खानदेशी बोलीभाषेचं वैभव व्यक्त करणारी ही कविता अनेकार्थानं समकालीन कविता आहे. या कवितेचं समकालीनत्व आत्यांतिक साधेपणातून, कुठलाही अभिनिवेष न बाळगता स्वाभाविकपणे व्यक्त झाले आहे.