Description
प्रस्तुत एकांकिकासंग्रहात समाविष्ट केलेल्या ‘उतारा’ (प्रेमानंद गज्वी) आणि ‘आकडा’ (राजकुमार तांगडे) या एकांकिका सामाजिक प्रबोधनाच्या प्रेरणेशी नाते सांगणाऱ्या आहेत. प्रस्थापित जातसत्ताक व्यवस्थेत माणूसपणाला नाकारणाऱ्या रूढी-परंपरांचे ‘संमती’च्या राजकारणातून केले जाणारे स्वाभाविकीकरण आणि सामाजिक न्याय मिळविण्यासाठी काढलेला विरोधाचा आवाज चिरडून टाकणारी समूहमानसिकता ‘उतारा’ एकांकिकेतून टोकदारपणे व्यक्त झाली आहे.
राजकुमार तांगडे यांच्या ‘आकडा’ एकांकिकेत निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटांशी मुकाबला करणारा असहाय शेतकरी, शासनाची गाव-खेड्याकडे पाहण्याची भेदजन्य दृष्टी आणि या प्रक्रियेत गुंतागुंतीचे व दीनवाणे होत जाणारे सर्वसामान्य माणसांचे जगणे इत्यादी प्रश्नांचा साक्षेपाने वेध घेतला आहे. जात, वर्ग, प्रदेश अशा विविध निकषांवर आधारित अधिसत्ता, सामाजिक धुरीणत्व प्रस्थापित करण्यासाठी घडविल्या व उपयोजिल्या जाणाऱ्या ‘दबावा’च्या ‘संमती’च्या संकेतचौकटी, शोषक-शोषितपणाची विविध नमुनारूपे आणि समताधिष्ठित समाजरचनेसाठी विविध पर्यायांचा शोध घेण्यातील अनिवार्यता परखडपणे मांडणाऱ्या या दोन्ही एकांकिका विचारप्रवर्तक आहेत.