Description
कवी लक्ष्मण महाडिक मराठी रसिकांना आता चांगलेच परिचित आहेत. या पंचवीस तीस वर्षात त्यांनी आपल्या कवितेचा वेगळा असा मोहोर उभविला. त्यांच्याकडून नवी कविता नवा प्रवाह येत गेला. त्यातलं नेटकं नवेपण अंगी घेऊन त्यांनी परंपरेची, खेड्याची, तिथल्या मातीची नाळ कधी सोडली नाही. अगदी सरळ साध्या शब्दात कितीही शहरीपणाचे वारे अंगावर आले तरी त्यांनी आपले खेडेपण सोडले नाही. तिथल्या जीवनातल्या सुखापेक्षा दुःखाच्या वेणा आपल्या कवितेतून शांतपणे सहज अशा बोली भाषेतल्या शब्दातून गावरान खेड्याच्या मराठमोळ्या पद्धतीनं गुंफल्या. मुक्त कविता असो की छंदोबद्ध कविता, ते शब्द शहरी रसिकांना कळो की न कळो, कृषी संस्कृतीचा हा शब्दकलेचा व बोलीभाषेचा बाज त्यांनी कधीही ढळू दिला नाही. ज्यांना खेडे, तिथली भाषा, ते खास शब्द, प्रतिमा माहित आहे. त्यांची अशी ही कविता खूप खूप आनंद देवून जाते. त्यांच्या कवितेत नाविन्याचा पाझर आहे. वास्तवाचे प्रखर भान आहे. तिथल्या संवेदना मांडणारे शब्द आहे. सभोवतालचं वर्तमान तटस्थपणे पाहण्याचं, न्याहळण्याचं त्याचं विश्लेषण करण्याचं, त्यांच्या शब्दात सामर्थ्य आहे. म्हणून तिथल्या परंपरेच्या जीवनातल्या छटा थेट तशा प्रतिमा घेऊन त्यांची कविता येते. त्यांच्या संपूर्ण काव्यसंग्रहात विशेषतः स्त्रियांच्या भरकटल्या जाणा-या आयुष्याची भैरवी वाचतांना आपण गलबलून जातो. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमा, तिथल्या वर्तमानाच्या वास्तवाचे कवडसे घेऊन येतात. त्या प्रत्येक प्रतिमा, शब्द आणि ओळींमध्ये ज्या पद्धतीने ही कविता येते. ती वाचकाच्या मनात घर करून बसते. त्यात माझ्यासारखा माणूस हे सगळं वाचतांना संपूर्ण कोलमडून पडतो. तिचं ते जन्मभर अंगी आलेलं दु:खं, त्याची कालवा कालव, तिला सोसणं अशक्य असलं, जीवघेणं असलं तरी ती पराकोटीच्या संयमानं आणि शहाणपणानं झेलते. रोजच्या तिच्या होरपळीनं व्यापलेल्या आयुष्याला तो दोष देत बसत नाही की आकांडतांडव करून ऊर बडवत नाही. ही खेड्यातली अतिशय सुजाण परिपक्क स्त्री संसाराची गोधडी फाटली, कितीही ऊसवली तरी नव्याने टाके घालून शिवून काढते. नवा पोतेरा भिंतींना, घराला, तिच्या मनाला व अवघ्या कुटुंबाला घालते. आणि स्वतःला कुटुंबाला आवरते. घराला घरपण आणते. अशा सियांच्या विराट दुःखाची कविता लक्ष्मण महाडिकांनी नेहमीच लिहिली आहे. या काव्यसंग्रहाच्या रुपानं त्यांनी स्त्री मध्यवर्ती ठेवून एक वेगळी माळ वेगवेगळ्या सर्गात टाकून काही नवं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कवितेचं हे पुढं जाणं मला खूपच आवडले. तुम्ही सावित्रीच्या, अहिलेच्या लेकी ताठ उभ्या रहा. अन्यायाविरुध्द समर्थपणे लढा, सन्मानाने, निर्भयपणे जगा. ‘ज्योतिबाची लेक म्हणून नाव आपलं सांगू नको’ किंवा ‘सावित्रीच्या लेकी’, ‘आता आपण कुठल पाहजे’, पुन्हा बंदिनी होऊ नको’, ‘तूही आता तोड दावं’, ‘सारीपाट मांडू दे’, ‘नवं सुक्त या सारख्या अनेक कातामधून त्यांना उभारी देण्याचं काम लक्ष्मण महाडिकांच्या कवितेनं केलं आहे. सर्व स्तर याचक त्यांच्या कवितांचं स्वागत करतील.