Description
मारुती सावंत यांची कविता एका प्रदेशाचं प्रतिनिधित्व करत असली तरीही ती देशातील कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश मांडत जाते. हे सर्व मांडताना कवितेच्या सौंदर्याला बाधा येऊ देत नाही. अनेक ठिकाणी चपखल उपमा, उत्प्रेक्षा, चेतनागुणोक्ती अलंकारांचा वापर करतांना दिसते. खरं तर अनुभवाचं मोठं व्यापक विश्व त्यांच्या जवळ आहे. हे त्यांची कविता अधोरेखित करून जाते. शेतात आणि समाजात रोज नवनवी तणं वाढताना, माजताना दिसतात. याची खंतही सावंतांच्या कवितेतून स्पष्ट होताना आढळते. तसेच सद्विचारांची जोपासना केल्यास सकारात्मक बदल होऊ शकतो. हा विश्वास त्यांची कविता देतांना दिसते.
भुकेचा व पाण्याचा प्रश्न सोडवतांना होणारे गुंते अधिक त्रस्त करून टाकतात. एक गुंता सोडतांना दुसरे गुंते अधिक अधिक त्रस्त करून टाकतात. एक गुंता सोडतांना दुसरे गुंते अधिक वाढत जातात. याच गुंत्यात गुंतून इथला कुणबी संपतो आहे. गरिबी, दारिद्र्य, मुलांचे लग्न, दारुचे व्यसन, कर्जबाजारीपण, अवर्षण ही गुंत्याची काही महत्त्वाची ठिकाणे, त्याच्या आयुष्याच्या वाटेवर ठाण मांडून असतात. त्यांच्या गुंत्यात भलेभले गुरफटत जातात. याला कारणीभूत काहीसा निसर्ग जसा आहे, तशीच समाज व्यवस्था असल्याचे भाष्य सावंताची कविता करताना दिसते. त्यांची कविता कष्टकऱ्यांचा टाहो फोडतांना दिसते.