Description
“स्त्रीजीवनाचे अनेक पदर उलगडत स्वत:चीही वेदना मुखर करणारी कविता ‘वादळवाट’ मधून साकारली जाते. वंदना महाजन यांनी केवळ स्वकेंद्री दृष्टी न ठेवता बहिर्मुख जगण्याचे अनेक आयाम आपल्या शब्दकळेतून अभिव्यक्त केले आहेत. मनात उठलेल्या प्रत्येक वादळाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारी ही कवयित्री वर्तुळ भेदण्याचा संस्कार जपू पाहते. आयुष्याच्या तिपेडी रस्त्यावर संघर्ष करताना, सावित्रीच्या आकांक्षापूर्तीचे स्वप्न जोजवत ठेवते. अगतिकता, अस्वस्थता, हतबलता आणि परंपरांच्या शृखंलांना दूर सारून स्वत:च्या परिघाला रुंदावण्याचा प्रयत्न करते. बुद्धाच्या डोळ्यातील स्थितप्रज्ञता आणि अपार करुणा यांच्याशी नाते जोडत कातळालाही भेदू पाहते. म्हणूनच वंदनाची कविता अस्सल भावनांना प्राधान्य देणारी, लादलेल्या गोष्टींना नाकारणारी आणि वादळवाटेवरही स्वतःचे मूल्य जपणारी ठरते. तिचे हे आत्मभान आणि त्यातून प्रकटणारा आत्मोद्गार ही या कवितेची खरी ताकद आहे, यात शंका नाही.”