Description
‘वाहते अंतर’ मध्ये सुमती लांडे यांच्या कवितेचा एक नवा चेहरा आपल्याला दिसतो. कवीची उत्कट भाववृत्ती आणि आपलं आतलं काहीही सांगायचं नाही अशा दोन परस्परविरोधी भावांच्या झगड्यात, एक प्रकारच्या मानसिक कल्लोळातून; त्याच्या चरकातून त्यांची कविता प्रकटलेली आहे. कवितेत सत्याखेरीज काहीच सांगता येत नाही आणि आपलं सत्य तर आपलं खाजगी असलेलंच बरं या वृत्तींमधून हा चरक तयार होतो. ही कविता कमळकाचा मधल्या कवितांपेक्षा अधिक खुलेपणानं प्रगटली आहे.
स्वप्न व वास्तवाच्या अनुभवांच्या अदलाबदलीच्या, घालमेलीच्या अनेक अवस्था ‘वाहते अंतर’ मधल्या कवितात आपल्याला दिसतात. तिथं वास्तवाच्या स्वप्नांच्या पातळीवर जसं नेलं जातं तसंच स्वप्नांना वास्तवाच्या पातळीवर खेचण्याची असोशीही प्रकट होते. आत्यंतिक भावनातिरेकापोटी येणारा एक प्रकारचा आतंकित चेहराही या कवितेला लाभला आहे. हे आतंक, आतल्या आत खच्चून आरोळ्या मारल्यासारखी उसवण आणि भिववणारे संमंजसपण ही काही लक्षणं नोंदवून ठेवण्यासारखी आहेत.
कमीतकमी रेषांचा वापर करून एखादं चित्र काढावं अशा ह्या कविता आहेत. म्हणूनच प्रत्येक शब्द, त्याचं वजन, त्याची क्रमातली जागा या साऱ्यांना नीट आपल्या आत घेऊन बघावं लागतं. कविता लिहून छापल्यावर ती जशी खाजगी उरत नाही तसंच कवीचं आंतरिक चरित्रही. याखेरीज या कवितांमध्ये अर्थ आणि आशयाच्या अंगाने अनुभवायच्या आणखी कितीतरी शक्यता खुल्या आहेत.