Description
मराठीत विज्ञानकथा-साहित्याची परंपरा तशी जुनी सांगता आली तरी तिला जोम असा अलिकडच्या काळातच आला, आणि तिला खरी प्रतिष्ठा लाभली ती डॉ० जयंत नारळीकर या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाच्या कथालेखनाने. ‘यक्षांची देणगी’ हा त्यांच्या विज्ञानकथांचा पहिला संग्रह मौज प्रकाशन गृहाने १९७९ साली प्रसिद्ध केला. त्याला सामान्य वाचकांची व चोखंदळ समीक्षकांची लगेच मान्यता मिळाली.
आधुनिक विज्ञानाच्या आधारावर भविष्यवेधी कल्पकतेने रचलेल्या मानवी जीवनातील संभाव्य घडामोडी डॉ० नारळीकरांच्या कथांमध्ये व्यक्त होतात. स्वतः अव्वल दर्जाचे शास्त्रज्ज्ञ असलेल्या नारळीकरांनी गंभीर वैज्ञानिक वातावरणात काहीसा विरंगुळा मिळावा व मनोविनोदन व्हावे म्हणून, पण मुख्यतः समाजात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजावा व प्रसृत व्हावा या हेतूने, विज्ञानकथांचे लेखन केले
विज्ञानकथेकडून ते कादंबरीकडे वळले. ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’ व ‘व्हायरस’ या त्यांच्या तीन विज्ञानकादंबऱ्या मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केल्या आहेत आणि त्यांनाही जाणकार वाचक-समीक्षकांची मान्यता प्राप्त झाली आहे.
नारळीकरांच्या कथा-कादंबरी लेखनात वैज्ञानिक तत्त्वांचा पाया पक्का असतो. त्यांच्या कल्पकतेच्या रसायनाने विज्ञानाच्या क्षेत्रातील माणसांचे भावविश्व, त्यातील नाट्यपूर्ण संघर्ष, त्यातील गूढ रहस्यमयता एकरस बनून जिवंत होते आणि मानवाच्या हिताची अंतिम मूल्यदृष्टी त्यात अढळपणे व्यक्त होते.







Reviews
There are no reviews yet.